
कॅनबेरा , 12 नोव्हेंबर (हिं.स.)। हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात भारत, जपान आणि अमेरिका हे संयुक्त युद्धाभ्यास “मालाबार” मध्ये सहभागी झाले आहेत. आज, बुधवारी ऑस्ट्रेलियाही या युद्धाभ्यासाचा भाग बनला आहे. मालाबार युद्धाभ्यास 10 नोव्हेंबरला सुरू झाला असून 18 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. ऑस्ट्रेलिया सामील झाल्यानंतर आता क्वाडच्या चारही सदस्य देशांनी या युद्धाभ्यासात सहभाग नोंदवला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीची ANZAC वर्गातील फ्रिगेट HMAS Ballarat आणि रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्सचे P-8A Poseidon Maritime Patrol Aircraft मालाबार युद्धाभ्यासात सहभागी होतील. पोसायडन हे गुआममधील Andersen Air Force Base वरून कार्यरत राहील.”
ऑस्ट्रेलियाचे चीफ ऑफ जॉइंट ऑपरेशन्स, वाइस अॅडमिरल जस्टिन जोन्स यांनी सांगितले की, “मालाबार युद्धाभ्यास वाढत्या प्रादेशिक भागीदारीचे आणि सतत बदलत असलेल्या सुरक्षेच्या आव्हानांचा सामना करण्याचे महत्त्व अधोरेखित करतो.”
युद्धाभ्यासात सहभागी असलेल्या ऑस्ट्रेलियन नौदल जहाजाचे कमांडर डीन युरेन यांनी सांगितले, “हा हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील सदस्य देशांमधील परस्पर कार्यक्षमतेला बळकटी देण्याची उत्तम संधी आहे. प्रादेशिक भागीदारांसह अशा युद्धाभ्यासामुळे आपण हिंद-प्रशांत प्रदेशातील सुरक्षा आव्हानांना अधिक प्रभावीपणे सामोरे जाऊ शकतो.” भारताकडून आयएनएस शयाद्री हा युद्धनौका मालाबार युद्धाभ्यासात सहभागी होत आहे.
मालाबार युद्धाभ्यासाची सुरुवात 1992 साली झाली होती. पहिल्यांदा अमेरिका आणि भारताने या युद्धाभ्यासात भाग घेतला होता. नंतर जपान आणि ऑस्ट्रेलिया देखील सामील झाले. हे चारही देश क्वाड संघटनेचे सदस्य असल्यामुळे मालाबार युद्धाभ्यास आता क्वाड देशांचा सामूहिक लष्करी सराव बनला आहे.
हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात चीनचे आव्हान सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या आव्हानाला तोंड देण्यासाठी आणि हिंद-प्रशांत प्रदेशातील नौवहन मुक्त आणि सुरक्षित ठेवण्यासाठी मालाबार युद्धाभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode