
परभणी, 12 नोव्हेंबर, (हिं.स.)।परभणी तालुक्यातील ब्रह्मपूरी तर्फे पाथरी शिवारात लागलेल्या आगीत तब्बल दहा एकरांवरील ऊस जळून खाक झाला. या घटनेत सुमारे आठ लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
विद्याभूषण शेषराव चव्हाण यांच्या मालकीच्या शेतात ही घटना घडली. त्यांनी यंदा दहा एकर क्षेत्रावर नव्याने ऊस लागवड केली होती. शनिवारी सकाळच्या सुमारास शेतातून धूर निघत असल्याचे दिसताच ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेतली. मात्र, काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण ऊस शेती जळून खाक झाली. गावातील शंभरहून अधिक ग्रामस्थांनी तीन तासांच्या शर्थीचे प्रयत्न करूनही आग आटोक्यात आणण्यात अपयश आले. लोंबकळलेल्या वीजतारा एकमेकांना स्पर्श झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
महसूल प्रशासनाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, कार्यक्षेत्रातील साखर कारखान्याकडूनही ऊसतोडीसाठी दोन टोळ्या पाठविण्यात आल्या आहेत. नुकसान भरपाई म्हणून सानुग्रह अनुदान देण्याची मागणी पीडित शेतकरी विद्याभूषण चव्हाण यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis