कंपोस्ट डेपोची स्थिती तपासून वेगाने काम करा - अमरावती मनपा आयुक्त
अमरावती, 12 नोव्हेंबर (हिं.स.) कंपोस्ट डेपोतील स्वच्छता, कचरा प्रक्रिया आणि कंपोस्ट निर्मितीची सद्यस्थिती तपासून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुधारणांसह वेगाने काम करण्याचे निर्देश मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिले. सुकळी कंपोस्ट डेप
कंपोस्ट डेपोची स्थिती तपासून वेगाने काम करा:कामात कुचराई नको, मनपा आयुक्तांचे निर्देश


अमरावती, 12 नोव्हेंबर (हिं.स.)

कंपोस्ट डेपोतील स्वच्छता, कचरा प्रक्रिया आणि कंपोस्ट निर्मितीची सद्यस्थिती तपासून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुधारणांसह वेगाने काम करण्याचे निर्देश मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिले. सुकळी कंपोस्ट डेपोमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार करण्यात आली असून सुप्रीम कोर्टातही सुनावणी सुरू आहे.

याच अनुषंगाने आयुक्तांनी सुकळी कंपोस्ट डेपो तसेच मृत जनावरांसाठी प्रस्तावित शव दाहिनीची सविस्तर पाहणी केली. या पाहणीदरम्यान अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्‍पा नाईक, शहर अभियंता रवींद्र पवार, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, पशुशल्य चिकित्सक डॉ. सचिन बोंद्रे, अभियंता राजेश आगरकर, कंत्राटदार प्रतिनिधी तसेच महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्तांनी कंपोस्ट डेपोतील सेंद्रिय कचरा प्रक्रिया पद्धती, वर्गीकरण यंत्रणा आणि स्वच्छता व्यवस्थेबाबत सखोल माहिती घेतली. त्यांनी डेपो परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक ठेवण्याच्या सूचना देत सांगितले की, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, वेळेवर प्रक्रिया आणि नागरिकांचा सहभाग हे ‘स्वच्छ अमरावती’ या मोहिमेचे मुख्य आधार आहेत. या कामात कोणतीही कुचराई चालणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande