
मुंबई, 12 नोव्हेंबर, (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी वा युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले असले तरी काँग्रेस पक्ष विचारधारेवर अढळ असून सत्तेची नाही तर विचारांची लढाई आहे. इंडिया आघाडीतील पक्ष व इतर समविचारी पक्षांशी आघाडीबाबत चर्चा होत आहे पण महायुतीतील कोणत्याही पक्षाही युती केली जाणार नाही असे स्पष्ट करून या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा लढवण्यावर काँग्रेस पक्षाचा भर आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडणूक मंडळाची महत्वाची बैठक टिळक भवन, दादर येथे झाली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे नेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, खा. रजनीताई पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खा. चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री आ. अमित देशमुख, आ. विश्वजित कदम, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, मुजफ्फर हुसेन, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, मोहन जोशी, कोषाध्यक्ष अभय छाजेड यांच्यासह निवड मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. प्रत्येक जिल्ह्यात आढावा बैठका, संकल्प सभा संपन्न होत आहेत, प्रत्येक जिल्ह्याला वरिष्ठ निरीक्षक तसेच विधानसभा मतदार संघासाठी निरीक्षक नियुक्त केलेले आहेत, त्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. शेवटच्या दिवसाची वाट न पहाता या बैठकीत निर्णय होतील. सर्वसमावेशक धोरण अवलंबून तिकीट वाटपातही सत्तेचे विकेंद्रीकरण व पारदर्शकता आणली जाईल तसेच आढावा घेऊन पुढील सूचना दिल्या जातील.
इंडिया आघाडी व मित्रपक्षांशी आघाडी...
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, इंडिया आघाडी म्हणून चर्चा करण्याच्या सुचना स्थानिक नेतृत्वाला दिल्या होत्या त्यानुसार त्यांनी घटक पक्ष तसेच स्थानिक आघाडीसंदर्भात चर्चा केली आहे. वामनराव चटप, राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटना, महादेव जानकर यांचा पक्ष यांच्याशी चर्चा सुरु असून काही जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी झाली आहे. मनसेसंदर्भात आघाडीचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत कालच आरक्षण जाहीर झाले आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतरच आघाडी करायची की स्वबळावर लढायचे यावर निर्णय घेतला जाईल, असेही सपकाळ म्हणाले..
उमेदवारी अर्ज प्रक्रिया सोपी व सुटसुटित करा.
राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. हा उमेदवारी अर्ज तब्बल २५ पानांचा असून तो ऑनलाईन पद्धतीने भरून त्याची प्रिंट काढून ऑफलाईन सादर करावयाचा आहे.ऑनलाईन अर्ज भरताना अनेक भागात इंटरनेट, सर्व्हर डाऊनच्या अडचणी येतात त्यामुळे विधानसभा व लोकसभा निवडणुकीला ज्यापद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया असते तशीच सोपी पद्धत असावी तसेच हे उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरण्याचीही मुभा द्यावी अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसने निवडणूक आयोगाला पाठवले आहे, अशी माहिती सपकाळ यांनी दिला.
पार्थ पवार यांच्यावर कारवाई होणार नाही..
पार्थ पवार यांच्या भूखंड घोटाळ्यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पार्थ पवार यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. भाजपा महायुती सरकार बेशरम आहे. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ म्हणत सत्तेवर आले पण आता ‘तुम भी खावो, हम भी खाते है’, असा कारभार सुरु असून उपमुख्यमंत्री अजित पावर हे ‘तो मी नव्हेच’ नाटकातील ‘लखोबा लोखंडे’ची भूमिका पार पाडत आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर