
अमरावती, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। विद्युत कर्मचाऱ्याची कॉलर कडल्याप्रकरणी भाजपाचे पदाधिकारी सिध्दार्थ वानखडे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने ७ हजार रुपये दंड आणि दंडापैकी ४ हजार रुपये रक्कम फिर्यादीला देण्याचे निर्देश दिले आहेत.
भाजपाचे पदाधिकारी सिध्दार्थ वानखडे टोपेनगर येथे राहतात. एप्रिल २०१६ रोजी रात्री ११ बाजताच्या सुमारास परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने वानखडे कोर्ट चौकातील महावितरणच्या तक्रार निवारण केंद्रात तक्रार देण्याकरिता गेले आणि तक्रार दिली. तेव्हा तेथील कर्मचारी प्रल्हाद झोपाटे यांनी विद्युत पुरवठा दुरुस्तीकरिता तंत्रज्ञ गेलेले आहे म्हणून सांगितले असता वानखडे यांनी शिविगाळ केली आणि कॉलर पकडून जिवाने मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार झोपाटे यांनी गाडगेनगर ठाण्यात दिली.
त्या आधारावर पोलिसांनी सरकारी कामात अळथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. संबंधित प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील अॅड. प्रफुल्ल प्रकाश तापडिया यांनी साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्यापैकी काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाले. त्यानंतर दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. रामटेके यांनी आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याचे घोषित करून ७ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३० दिवस साधा कारावासाची शिक्षा तसेच दंडाच्या रक्कमेतील ४ हजार रुपये फिर्यादी झोपटे यांना देण्याचे आदेश दिले. या प्रकरणात पोलीस अंमलदार ईश्वर राठोड आणि संतोष चव्हाण यांनी सहकार्य केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी