दत्तात्रय वारे यांच्यासह कर्जत जामखेड मधील शरद पवार गटाचे अनेक कार्यकर्ते भाजपात
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत मुंबई, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड तालुक्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद पवार गटाचे दत्तात्रय वारे यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोब
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत


भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

मुंबई, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड तालुक्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद पवार गटाचे दत्तात्रय वारे यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत कर्जत जामखेड येथील शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारी, सरपंच, माजी सरपंच, बाजार समिती संचालक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. कराड उत्तर येथील अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षामध्ये स्वागत केले. या कार्यक्रमाला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, आ. मनोज घोरपडे, ज्येष्ठे नेते सुनील कर्जतकर, अंबादास पिसाळ, अनील गजाबे, प्रवीण घुले, काकासाहेब तापकीर, राजेंद्र गोंडस, संतोष मेहेत्रे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाची दृष्टी आणि द्रष्टे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात विकासाची नवी उंची गाठली जात आहे. देश सशक्त बनवण्यासाठी सशक्त भाजपा होणे गरजेचे आहे. देशाला बलशाली बनवण्यासाठी या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ज्या विश्वासाने या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही श्री. चव्हाण यांनी दिली.

यावेळी सभापती शिंदे म्हणाले की, समाजकारणाचा दांडगा अनुभव असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्याचा फायदा पक्ष बळकटीसाठी होणार आहे. प्रवेश केलेल्या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांच्या साथीने परिसरातील प्रलंबित कामे पूर्ण केली जातील. या सर्वांच्या साथीमुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला मोठे यश मिळेल.

यावेळी आ. घोरपडे म्हणाले की, देश आणि राज्यात विकासाच्या सुरू असलेल्या घोडदौडीने प्रेरित होऊन राष्ट्रवादी श.प. गटातील कार्यकर्त्यांनी आज प्रवेश केला. पाल इंदोली उपसा सिंचन योजनेचा प्रश्न केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपाच मार्गी लावू शकतो हे लक्षात घेऊन या सर्वांनी भाजपाला साथ दिली. सर्वांच्या साथीने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळवून देऊ असा शब्द आ. घोरपडे यांनी दिला.

श्री. वारे म्हणाले की, भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. साधा कार्यकर्ता पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री होऊ शकतो. विकासाच्या राजकारणाने प्रेरित होत अनेक जण भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. शरद पवार राष्ट्रवादी ही पवार कुटुंबाची खासगी कंपनी असून ठिकठिकाणी त्यांच्या शाखा आहेत. समाजकारणाशी त्यांना देणेघेणे नाही असेही श्री. वारे म्हणाले.

अहिल्यानगर जिल्ह्यातून भाजपात प्रवेश केलेल्यांमध्ये मुंबईचे माजी सहाय्यक आयुक्त राजेंद्र पवार, कर्जतचे नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, कवडगावचे माजी सरपंच सखाराम भोरे, जामखेड पंचायत समितीचे माजी उपसभापती दादासाहेब रिटे, कवडगावचे सरपंच सीताराम कांबळे, सुंदरदास बिरंगळ यांसह अनेकांचा समावेश आहे.

कराड उत्तर तालुक्यातील यशवंतराव चव्हाण पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष सतीश शिंदे, ज्येष्ठ नेते सुभाष गोरे, नरेंद्र साळुंखे, माजी सरपंच जनार्दन साळुंखे, आदर्श शेतकरी प्रवीण साळुंखे, उद्योजक प्रशांत जाधव, माजी सरपंच तानाजी पाटील, जालिंदर लामजे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande