
श्रीनगर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।दिल्ली स्फोट प्रकरणात जैश मॉड्यूलशी संबंधित दहशतवादी डॉक्टरांबाबत पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. काश्मीरमधून आणखी एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या दहशतवादी डॉक्टरची ओळख कुलगाम जिल्ह्याचा रहिवासी डॉ. तजामुल अशी झाली आहे. तो श्रीनगर येथील एसएमएचएस रुग्णालयात नोकरी करत होता.
पोलिसांनी डॉक्टर तजामुलला करण सिंह नगर येथून अटक केली आहे. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा आता त्याची सखोल चौकशी करणार आहेत. यापूर्वी, मंगळवारी (11 नोव्हेंबर) जम्मू-काश्मीर पोलिसांनी पुलवामामधून एका डॉक्टरला ताब्यात घेतले होते, ज्याची ओळख सज्जाद अहमद मल्ला अशी झाली. सज्जाद मल्ला हा दिल्ली स्फोटाचा मुख्य आरोपी आणि दहशतवादी डॉक्टर उमरचा मित्र असल्याचे सांगितले जात आहे.
कुलगाम पोलिसांनी बुधवारी (12 नोव्हेंबर) सांगितले की, बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामी (जेईआय) संघटनेविरुद्ध मोठ्या कारवाईच्या अंतर्गत जिल्यातील 200 हून अधिक जेईआय ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली.दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेल्या स्फोटानंतर पोलिसांनी दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. आतापर्यंत 1500 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकांविरुद्ध घाटीतील अनेक जिल्यांमध्ये अचानक तपासणी करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तान अधिकृत काश्मीर (पीओके) मध्ये राहणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या रहिवाशांच्या आणि यूएपीएच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या व्यक्तींच्या मालमत्तांची तपासणी करण्यात आली आहे. लाल किल्ला स्फोटाच्या धाग्यांचा संबंध श्रीनगरमध्ये सापडलेल्या पोस्टरांशी जोडला जात आहे. हे पोस्टर श्रीनगरच्या नौगाम पोलिस चौकीच्या हद्दीतून जप्त करण्यात आले.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी शोपियांहून मौलवी इरफान अहमद आणि गांदरबलच्या वाकुरा येथून जमीर अहमद नावाच्या व्यक्तीला अटक केली. सूत्रांच्या माहितीनुसार, 5 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून दहशतवादी डॉक्टर अदीलला अटक करण्यात आली होती. त्यानंतर 7 नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमधील एका रुग्णालयातून एके-56 रायफल आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. याच मालिकेत 8 नोव्हेंबर रोजी फरीदाबादच्या अल-फलाह मेडिकल कॉलेजमधूनही शस्त्रे आणि स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode