
नवी दिल्ली , 12 नोव्हेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भुटानच्या त्यांच्या दोन दिवसीय दौर्यावरून परतले आहेत. भुटानहून परतल्यानंतर पंतप्रधान मोदी थेट एलएनजेपी रुग्णालयात पोहोचले आणि दिल्लीतील स्फोटात जखमी झालेल्या लोकांची भेट घेतली.दरम्यान, पंतप्रधान मोदी रुग्णालयात येणार असल्याची माहिती मिळताच दिल्ली पोलिस सतर्क मोडवर गेले आहेत.
माहितीनुसार, दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान मोदी लोकनायक रुग्णालयात पोहचले. यावेळी त्यांनी जखमींशी संवाद साधला आणि त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. रुग्णालयातील अधिकारी आणि डॉक्टरांनी पंतप्रधानांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. यावेळी पंतप्रधान म्हणाले, “या कटाच्या मागे जे लोक आहेत, त्यांना न्यायाच्या कठघऱ्यात उभे केले जाईल. दोषी कितीही असले तरी त्यांना क्षमा केली जाणार नाही.”
दरम्यान, पंतप्रधान मोदी रुग्णालयात येणार असल्याची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी आयटीओवरील बहादुरशाह झफर मार्गावर उभ्या असलेल्या सर्व वाहनांना हटविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्या परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी इशारा दिला आहे की, 20 मिनिटांत परिसर रिकामा न केल्यास क्रेनद्वारे वाहन हटवले जातील. पीसीआर व्हॅनमधून सतत सूचना दिल्या जात आहेत.
लाल किल्ल्याजवळ झालेल्या या दहशतवादी स्फोटात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून २६ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींचा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode