'धरमपाजीं'ना डिस्चार्ज, घरीच उपचार राहणार सुरू
मुंबई, १२ नोव्हेंबर (हिं.स.) : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र अर्थात धरमपाजींना बुधवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या त्यांना जुहू येथील घरी नेण्यात आलं असून त्यांच्यावरील पुढील उपचार घरीच सुरू राहतील, अशी माहिती समोर
धर्मेंद्र


मुंबई, १२ नोव्हेंबर (हिं.स.) : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र अर्थात धरमपाजींना बुधवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या त्यांना जुहू येथील घरी नेण्यात आलं असून त्यांच्यावरील पुढील उपचार घरीच सुरू राहतील, अशी माहिती समोर येत आहे.

धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास जाणवल्याने गेल्या काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोमवारी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान आता त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (बुधवार) सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांना घरी नेण्यात आलं आहे. डिस्चार्जच्या वेळी त्यांचा मुलगा बॉबी देओल तिथे उपस्थित होता.

अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीक समदानी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांच्यावर बऱ्याच काळापासून माझ्याकडून उपचार सुरू आहेत. त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, परंतु उपचार प्रक्रिया, म्हणजेच त्यांचे उपचार घरीही सुरू राहतील.

सोमवारी दुपारपासूनच धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी चिंंता व्यक्त करण्यात येत होती. ते व्हेंटिलेटरवर असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु उपचारांना ते प्रतिसाद देत असल्याची माहिती वारंवार त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात येत होती. मंगळवारी त्यांच्या निधनाच्या अफवाही सोशल मीडियावर पसरल्या होत्या. त्यावर मुलगी ईशा देओल आणि पत्नी हेमा मालिनी यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. देओल कुटुंबीयांच्या खासगीपणाचा आदर करावा, असं आवाहन त्यांच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आले होते.

बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र गेल्या सहा दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. त्यांचा ‘इक्किस’ हा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे येत्या डिसेंबर महिन्यात ते आपला 90 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande