
एसएमएस कंपनीच्या दूषित पाण्याने शेतीचे नुकसान
अमरावती, 12 नोव्हेंबर (हिं.स.)
नांदगाव पेठ औद्योगिक क्षेत्रातील पंचतारांकित एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एसएमएस या जलशुद्धीकरण करणाऱ्या कंपनीच्या दूषित पाण्याने आजूबाजूच्या शेतांची अक्षरशः राखरांगोळी केली आहे. या कंपनीचे रासायनिक मिश्रित पाणी थेट शेतात शिरल्याने शेती पूर्णतः उजाड झाली असून, शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडले आहेत. शासनाकडे गेली चार वर्षे शेती अधिग्रहण आणि मोबदला मागणीसाठी पाठपुरावा सुरू असतानाही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने येथील शेतकरी मारोतराव बानासुरे यांचा निराशेच्या गर्तेत मृत्यू झाला.बानासुरे यांची शेत सर्व्हे क्र. ३५/२-१, क्षेत्रफळ ५१ आर असलेली त्यांची शेती पूर्णपणे एसएमएस च्या दूषित पाण्याने नापीक झाली होती. शेतीवरच उपजीविका अवलंबून असलेल्या बानासुरे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. शेती नापीक, उत्पन्न बंद आणि मोबदला न मिळाल्याने मानसिक ताण वाढला. अखेर आजारपणात त्यांची झुंज संपली.शासनाचे दुर्लक्ष आणि कंपनीवर कारवाईचा अभाव हेच या दुर्दैवी मृत्यूचे मूळ कारण असल्याची चर्चा परिसरात आहे. बानासुरे यांच्या मृत्यूनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकरी अजूनही दूषित पाण्याच्या फटक्यात सापडले असून, त्यांच्या जमिनी देखील उजाड झाल्या आहेत. “शासनाने जर वेळीच मोबदला दिला असता, आणि एसएमएस कंपनीवर नियंत्रण ठेवले असते, तर आज एक शेतकरी वाचला असता. आणखी किती मृत्यू नंतर प्रशासन जागे होणार? असा प्रश्न स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.चार वर्षांपासून नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरातील शेतकरी फक्त दिलास्याच्या अपेक्षेने सरकारी दारात हेलपाटे मारत आहेत, मात्र त्यांच्या जमिनी नापीक होत असताना सरकार व प्रशासन मात्र मौन बाळगून आहे. आता तरी शासनाने तातडीने दखल घेऊन मोबदला, पुनर्वसन आणि दूषित पाणी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.
शेतकऱ्यांच्या चपला झिजल्या तरी न्याय नाही!
नांदगाव पेठ औद्योगिक क्षेत्रातील शेतकरी चार वर्षांपासून मोबदला व पुनर्वसनासाठी शासन दरबारी भटकंती करत आहेत. आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा निघालेला नाही. उद्योग विभागाच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.शेतकऱ्यांच्या चपला झिझल्या तरी मात्र न्याय नाही अश्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी