
मुंबई, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।बॉलिवूडचा अभिनेता गोविंदा याला अचानक तब्येत बिघडल्यामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोविंदा त्याच्या जुहू येथील निवासस्थानी अचानक बेशुद्ध पडला, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.
गोविंदाचा मित्र आणि वकील ललित बिंदलने सांगितलं की, ''काल संध्याकाळी त्याला डिसओरिएंटेशन अटॅक आला होता. गोविंदा घरीच होता. त्यावेळी अचानक त्याची स्मृती गेली. त्यामुळे तो काहीसा गोंधळला आणि बेशुद्ध झाला. या अटॅकमध्ये काहीवेळ त्या व्यक्तीला काही आठवत नाही आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना ओळखणं त्याला अवघड होतं. गोविंदाची तब्येत ठीक नव्हती. थोडा अशक्तपणा आणि अस्वस्थपणाचा त्यांना वाटत होता.''
''यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार गोविंदाला मार्गदर्शन करण्यात आलं आणि औषधं देण्यात आली. परंतु संध्याकाळी त्याला पुन्हा अस्वस्थ वाटल्याने रात्री १ वाजता गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. गोविंदाची तपासणी करण्यात आली असून आम्ही रिपोर्ट्सची वाट बघतोय. डॉक्टरांनी काही नियमित वैद्यकीय तपासणीही केल्या आहेत. डॉक्टर पुढे काय सांगतात, याकडे आमचं लक्ष आहे.''
''गोविंदाला जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा त्याची पत्नी सुनिता एका लग्नाला गेली होती. त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यही बाहेर असल्याने त्यावेळी कोणी उपस्थित नव्हतं. आता सर्वांना कळवण्यात आलंय, सर्वजण जमेल तसं गोविंदाला भेटायला येत आहेत'', अशाप्रकारे गोविंदाचे मित्र ललित यांनी घडलेला घटनाक्रम सर्वांना सांगितला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode