
अमरावती, 12 नोव्हेंबर (हिं.स.)
तिवसा तालुक्यातील सेतू केंद्रावर गेल्या काही दिवसांपासून आधार कार्ड अपडेटसाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडालेली दिसत आहे. पहाटेपासूनच महिलावर्ग, पुरुष, युवक-युवती तसेच शालेय विद्यार्थी केंद्राबाहेर रांगा लावत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.राज्य शासनाच्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या केवायसी प्रक्रियेसाठी तसेच इतर अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अद्ययावत करणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे तिवसा शहरातील सेतू केंद्रावर रोज सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी होत असून, काही वेळा केंद्राबाहेर रांगा अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत पोहोचतात. मोबाईल नंबर लिंक करणे, बँक खाते जोडणे, पत्ता सुधारणा, फोटो बदल अशा विविध कारणांसाठी नागरिकांकडून अपडेट प्रक्रिया सुरू आहे. सकाळी आठच्या आतच केंद्राबाहेर शेकडो नागरिक उपस्थित होत असून, विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण आपला क्रमांक लागण्याची प्रतीक्षा करीत बसलेले दिसतात. काहीजण तासन्तास उभे राहून आपला क्रमांक लागेल या आशेने थांबलेले असतात.सेतू केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ऑनलाइन प्रक्रिया सकाळी १०.३० वाजता सुरू होते आणि प्रत्येक आधार अपडेटसाठी सुमारे १५ ते २० मिनिटांचा वेळ लागतो. ही प्रक्रिया सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू राहते. त्यामुळे रांगेतील नागरिकांना क्रमांक लागेपर्यंत दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे.दरम्यान, वारंवार जाणारा वीजपुरवठा आणि सर्व्हर डाऊनचा त्रास ही नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. काही वेळा एक ते दोन तासांपर्यंत सर्व्हर बंद राहतो, त्यामुळे प्रक्रिया ठप्प होते आणि प्रतीक्षा अधिक वाढते. “लाईट गेली की आमचं काम थांबतं, सर्व्हर चालू होईपर्यंत बसून राहावं लागतं,” अशी तक्रार अनेक नागरिकांनी व्यक्त केली.शासनाने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजना अशा विविध लाभ योजनांसाठी आधार लिंक करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची या केंद्रावर अक्षरशः झुंबड उडाल्याचे चित्र तिवसा तालुकाभर दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी