दिल्ली स्फोटात हाय-ग्रेड मिलिटरी एक्सप्लोसिव्हच्या वापराचे संकेत
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्लीत सोमवारी झालेल्या स्फोटाच्या तपासात नवे धक्कादायक माहिती पुढे आहेत. प्राथमिक चौकशीत या स्फोटात हाय-ग्रेड मिलिटरी एक्सप्लोसिव्ह वापरल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या सहभागाची शक्यता नाकारत
दिल्ली बॉम्बस्फोटातील क्षतीग्रस्त वाहने


नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्लीत सोमवारी झालेल्या स्फोटाच्या तपासात नवे धक्कादायक माहिती पुढे आहेत. प्राथमिक चौकशीत या स्फोटात हाय-ग्रेड मिलिटरी एक्सप्लोसिव्ह वापरल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या सहभागाची शक्यता नाकारता येत नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत.

तीव्रतेवरून स्फोटकाचा अंदाज

घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांनुसार स्फोटाची तीव्रता अत्यंत जास्त होती. त्यामुळे हा स्फोट साध्या अमोनियम नायट्रेटसारख्या स्फोटकांनी घडविणे शक्य नसल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. फरीदाबादमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरून जप्त स्फोटकांपेक्षा हे स्फोटक अधिक प्रभावी असल्याचे दिसून येत आहे.

तुर्की आणि जैश-ए-मोहम्मदचा दुवा

तपासात दहशतवादी उमर नबी आणि मुजम्मिल यांनी तुर्की दौऱ्यादरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या हँडलर्सशी संपर्क साधल्याचे पुरावे मिळाले आहेत. या दुव्यामुळे लाल किल्ला स्फोटाची आंतरराष्ट्रीय कटाशी सांगड घातली जात आहे. तपास यंत्रणांच्या मते, हा स्फोट अचानक नाही, तर 26/11 प्रमाणे मोठ्या प्रमाणावर समन्वित हल्ल्याची पूर्वतयारी होती.

फॉरेन्सिक तपास सुरू, 200 हून अधिक नमुने गोळा

स्फोटात नष्ट झालेल्या कारचे सर्व भाग रोहिणी येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. एफएसएल, सीबीआय आणि एनआयएच्या संयुक्त टीम्स नमुन्यांची तपासणी करत आहेत. घटनास्थळावरून सुमारे 200 नमुने गोळा करण्यात आले असून, काहींची प्राथमिक चाचणीही सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, स्फोटानंतर आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर केल्यामुळे रासायनिक घटक धुऊन गेले असावेत, त्यामुळे निष्कर्ष गाठण्यास विलंब होत आहे.

दिल्ली हादरवण्याचा मोठा कट

तपासातून उघड झाले आहे की जैशच्या मॉड्यूलने दिल्ली आणि एनसीआरमध्ये एकाचवेळी अनेक स्फोट घडवण्याची योजना आखली होती. इंडिया गेट, कॉन्स्टिट्यूशन क्लब, सरोजिनी नगर आणि लाजपत नगर बाजारपेठा हेही त्यांचे लक्ष्य होते. मात्र तयारी अपुरी राहिल्यामुळे हा कट तात्पुरता स्थगित करण्यात आला होता.

पुलवामामध्ये जैशच्या समर्थनार्थ पोस्टर लावल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोहीम हाती घेतल्याने डॉ. उमर नबीने हताशपणे लाल किल्ल्याबाहेर आत्मघाती हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे.

नवे इनपुट; लाल रंगाची कार जप्त

पोलिसांना बुधवारी मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. उमर नबीसोबत दोन साथीदार लाल रंगाच्या इको-स्पोर्ट्स कारमधून दिल्लीत दाखल झाले होते. बदरपूर टोलवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये त्यांचे फोटो कैद झाले आहेत. ही कार उमर नबीच्या नावावर असून ती राजौरी गार्डनच्या पत्त्यावर नोंदणीकृत आहे. पोलिसांनी ही कार बुधवारी संध्याकाळी ताब्यात घेतली आहे.

सरकारी प्रतिक्रियेची प्रतीक्षा

लष्करी स्फोटकांचा वापर आणि संभाव्य पाकिस्तानी सहभाग यावर केंद्र सरकारने अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र गुप्तचर यंत्रणांना उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आले असून, राजधानी परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे.-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande