
मानवी जीवनाची मूलभूत रचना ही परस्परावलंबनावर आधारलेली आहे. आपण एकमेकांशिवाय जगू शकत नाही ही वस्तुस्थिती जशी खगोलशास्त्रीय तत्त्वांनी सिद्ध होते, तशीच ती समाजशास्त्रीय आणि मनोवैज्ञानिक अभ्यासांतही सिद्ध होते. माणूस हा सामाजिक प्राणी आहे ही परिभाषा केवळ पाठ्यपुस्तकातील ओळ म्हणून आपण स्वीकारली असली तरी या वाक्यातील ‘सामाजिक’ या शब्दाच्या मागे दडलेले सर्वांत संवेदनशील, सुक्ष्म आणि गहीरे तत्त्व म्हणजेच दयाळूपणा होय. याच भावनेची जाणीव तेव्हा आणखी स्पष्ट होते, जेव्हा आपण १३ नोव्हेंबर रोजी साजरा होणारा ‘जागतिक दयाळूपणा दिवस’ साजरा करतो. या दिवसाचे औचित्य आपल्याला केवळ एखादी औपचारिक स्मृती नव्हे, तर मानवी सभ्यतेच्या मूळ आत्म्याची पुनश्च आठवण करून देते. दयाळूपणा हा कोणत्याही अर्थाने केवळ दान करणे, मदत देणे, सहानुभूती व्यक्त करणे एवढ्यावर मर्यादित न राहता, हा माणसाच्या व्यक्तिमत्वाचा, विचारप्रणालीचा आणि सामाजिक व्यवहार संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे.
इतिहासाच्या पृष्ठांवर नजर टाकली तर जगातील सर्व धर्म, तत्त्वज्ञान, समाजव्यवस्था आणि क्रांतिकारक विचारधारा ‘दयाळूपणाला’ मानवी जीवनाच्या अविभाज्य घटकाच्या रूपाने मांडताना दिसतात. गौतम बुद्धांच्या करुणावादापासून महावीरांच्या अहिंसेपर्यंत, सूफी संतांच्या प्रेमसंवादापासून संत तुकारामांच्या वारकरी भावपरंपरेपर्यंत, गांधीजींच्या ‘अहिंसा आणि सत्य’ तत्त्वज्ञानापासून ते आधुनिक काळातील मानवतावादी चळवळीपर्यंत सर्वांनी दयाळूपणाला मानवी प्रगतीचे मूळ स्वरूप मानले. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर दयाळूपणा ही मानवी संबंधांची बंधरचना दृढ करणारी अदृश्य साखळी आहे. कुठलीही संस्कृती परस्परांतील विश्वास, आदर आणि सहजीवन यांवर उभी असते. आणि या तिन्ही मूल्यांच्या पायावर दयाळूपणाचा कौल असणे आवश्यक असते. दयाळूपणा नसलेली व्यक्ती केवळ भौतिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकते, परंतु मानवी अर्थाने ती परिपूर्ण होत नाही.
असे असताना आजच्या जागतिकीकरणाच्या, यांत्रिकीकरणाच्या, तंत्रज्ञानाधारित वेगवान जीवनशैलीने मानवी संवाद अधिकाधिक डिजिटल केला आहे. संदेश, अभिवादन, चिंता, जवळीक यांना भौतिक स्वरूपापेक्षा डिजिटल स्वरूप प्राप्त झाले. भावनांची देवाणघेवाण ही प्रत्यक्ष संवादातून न होता आभासी माध्यमांद्वारे व्हायला लागली. या प्रक्रियेत एक महत्त्वाची गोष्ट हरवू लागली ती म्हणजे भावनिक जवळीक होय. जवळीक कमी झाल्यावर हळूहळू करुणा कमी होते, करुणा कमी झाली की दयाळूपणा कमी होतो. एखाद्याचे दुःख पाहणे, त्याच्या डोळ्यांतील पाणी ओळखणे, त्याच्या आवाजातील वेदनेचा सूर जाणवणे ही क्षमता कमकुवत होऊ लागली. समाजशास्त्र सांगते की जेव्हा समाजाची भावनिक संवेदनशीलता घटते तेव्हा समाजात स्वार्थ, भेदभाव, विभाजन, असहिष्णुता, हिंसा आणि तणाव वाढू लागतात. आणि हेच आपण जगभरात विविध स्वरूपांत पाहू लागलो आहोत.
आजचे जग भांडवलशाहीच्या स्पर्धात्मक मूल्यांनी व्यापलेले आहे. इतरांपेक्षा पुढे जाणे, अधिकाधिक मिळवणे, यशाचे मोजमाप आर्थिक आणि भौतिक निकषांनी करणे आणि त्यामध्ये मानवी संबंध आणि भावनिक मूल्यांकडे दुर्लक्ष करणे हा प्रवाह वाढतो आहे. समाजशास्त्रीय भाषेत याला ‘मानवीकरणाचा क्षय’ (Dehumanization) म्हणतात. ज्या समाजात दयाळूपणाचा अभाव वाढतो त्या समाजात व्यक्तींची ओळख त्यांच्या हक्कांपेक्षा कर्तव्यांच्या मर्यादेत, संबंधांपेक्षा व्यवहारांमध्ये, भावना पेक्षा तर्काच्या कोरडेपणात अडकू लागते. आणि अशावेळी दयाळूपणा हा केवळ नैतिक मूल्य नसून समाजाच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग बनतो. कारण दयाळूपणाचे एक विलक्षण वैशिष्ट्ये म्हणजे तो ‘वाटला’ की कमी न होता अधिक वाढतो.
दयाळूपणाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सहानुभूतीहोय. म्हणजे ‘समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीचे, वेदनेचे, आनंदाचे, असुरक्षिततेचे अचूक भान निर्माण करणे’. केवळ समजून घेणे नाही तर त्या जाणिवेतून कृतीकडे जाणे हा खरा दयाळूपणा होय. एखाद्या वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडण्यास मदत करणे, परीक्षेत अपयशी झालेल्या विद्यार्थ्याला आधार देणे, निराश झालेल्या मित्राच्या मनातील गुंता समजून घेणे, भुकेलेल्या व्यक्तीस अन्न देणे, वा फक्त कोणाच्या दु:खाच्या क्षणी काहीच बोलू न देता शांतपणे सोबत राहणे या कृतींचे मूल्य पैशात मोजता येत नाही, पण या कृती मनुष्याला मनुष्य म्हणून सिद्ध करतात.
सध्याच्या काळात जागतिक स्तरावर विविध मानवी संकटे उभी आहेत; युद्धे, स्थलांतर, दारिद्र्य, सामाजिक असमानता, पर्यावरणीय संकटे, मानसिक आरोग्याचे प्रश्न, तुटलेली कुटुंबव्यवस्था, वाढता तणाव, असहिष्णुता, सायबर धमक्या, सोशल मीडियामुळे निर्माण होणारी तुलना आणि कमतरतेची भावना इत्यादी. या सर्व समस्यांमागे एक अदृश्य पण प्रमुख कारण दिसते ते म्हणजे मानवी संबंधांची पोकळी होय. ही पोकळी दयाळूपणानेच भरता येते. दयाळूपणा हा मानसिक आरोग्यासाठी औषध आहे, सामाजिक ऐक्याचा पाया आहे, संघर्ष निराकरणाचे साधन आहे आणि मानवी अस्तित्व टिकवून ठेवण्याचे मूलतत्त्व आहे.
दयाळूपणाचे समाजशास्त्रीय एक महत्त्वाचे तत्त्व म्हणजे ‘सामाजिक भांडवल’ (Social Capital) होय. जेव्हा समाजातील लोक एकमेकांशी सहानुभूतिपूर्ण, सहयोगी आणि विश्वासू संबंध राखतात तेव्हा समाज अधिक सुदृढ, सुरक्षित आणि प्रगत होतो. दयाळूपणा वाढला की समुदायांमध्ये एकत्रित कार्यक्षमता वाढते. उदा. एखाद्या गावात किंवा वस्तीत संतुलित आणि मदतशील वातावरण असल्यास त्या ठिकाणी गुन्हेगारी कमी असते, एकोपा अधिक असतो, संकटात सर्व एकत्र उभे राहतात, आणि विकासाची प्रक्रिया अधिक सुकर होते. म्हणजेच दयाळूपणाचा समाजावर व्यापक आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिणामही असतो.
शाळा, कुटुंब, मित्रमंडळी, समाजसंस्था आणि शासनव्यवस्था या सर्व पातळ्यांवर दयाळूपणा हे मूल्य पेरणे गरजेचे आहे. बालक हा जे पाहतो ते शिकतो. जर घरातील वातावरण करुणामय, जिव्हाळ्याचे, संवेदनशील असेल तर मूलही तसेच मूल्य आत्मसात करते. शाळांनी फक्त स्पर्धा नव्हे तर सहकार्य, परस्पर मदत, समूहभावना, विविधतेचा सन्मान ही मूल्ये शिकवणे आवश्यक आहे. समाजातील माध्यमांनी हिंसा, द्वेष, भेदभाव, असहिष्णुता यांना हवा देण्याऐवजी मानवतेचे उदाहरण घडवणाऱ्या कथा पुढे आणल्या पाहिजेत. शासनाच्या धोरणांतही दुर्बल घटक, वंचित समुदाय, अपंग, वृद्ध, अनाथ, महिला आणि पीडित यांच्यासाठी आधारयोजना दयाळूपणेच्या भावनेतूनच प्रभावीपणे लागू केल्या जाऊ शकतात.
दयाळूपणा हा एखाद्याने ‘जास्त’ आणि एखाद्याने ‘कमी’ असा मोजण्याचा विषय नाही. दयाळूपणा हा प्रत्येकासाठी साधा, सहज आणि सर्वांच्या आवाक्यातील भाव आहे. आपण ज्या क्षणी एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणतो, त्या क्षणी आपण जग थोडेसे अधिक सुंदर बनवत असतो. आणि जग सुंदर व्हावे यासाठी मोठमोठे जागतिक करार किंवा महाकाय क्रांतींची गरज नसते तर गरज असते ती प्रत्येक मनातील लहान, सोप्या आणि सातत्यपूर्ण दयाळूपणाच्या कृतीची.
शेवटी, दयाळूपणा हा कोणताही ‘दिवस’ नसून जीवनशैली आहे. हा दिवस आपल्याला केवळ स्मरण देते की आपण माणूस म्हणून जगण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आपण कितीही विकसित, शिक्षित, सक्षम किंवा संपन्न झालो तरी ‘दयाळूपणा’ नसल्यास आपण अपूर्ण आहोत. म्हणूनच या जागतिक दयाळूपणा दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने स्वतःला एक साधा प्रश्न विचारावा की मी कुणासाठी आज ‘थोडेसे अधिक माणूस’ होऊ शकतो? या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच मानवतेचा खरा उत्सव होय. कारण जग बदलण्यासाठी कधीकधी मोठा अभिमान नको असतो तर फक्त एक छोटासा दयाळू हात पुरेसा असतो.
डॉ. राजेंद्र बगाटे, (समाजशास्त्राचे अभ्यासक) मो. क्र. ९९६०१०३५८२, ईमेल – bagate.rajendra5@gmail.com
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी