
मुंबई, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप यांच्या सौजन्याने सादर झालेल्या लिटरेचर लाईव्ह! द मुंबई लिटफेस्टच्या 16 व्या सत्राची सांगता रविवारी यशस्वीरित्या झाली. या उत्सवाने पुन्हा एकदा मुंबईचे भारताची सांस्कृतिक आणि साहित्यिक राजधानी म्हणून असलेले स्थान आणखी दृढ केले. तीन उत्साही दिवसांमध्ये या महोत्सवाने भारत तसेच जगभरातील 120 हून अधिक प्रसिद्ध लेखक, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणले.
गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नादिर गोदरेज म्हणाले “साहित्यामध्ये आपल्या काळाचे सार सामावून घेण्याची, प्रश्न विचारण्याची, आश्वस्त करण्याची आणि जोडण्याची ताकद आहे. लिटरेचर लाईव्ह! द मुंबई लिटफेस्टच्या माध्यमातून आम्ही फक्त कथा आणि कल्पना साजऱ्या करत नाही, तर नवकल्पना आणि प्रगतीला चालना देणाऱ्या कुतूहलाच्या भावनेचा उत्सव साजरा करतो. सर्जनशीलता; मग ती विज्ञान, व्यवसाय किंवा कला कशाहीमधली असो तिचे मूळ हे वेगळ्या पद्धतीने कल्पना करता येण्याच्या धैर्यावर आधारित असते या आमच्या विश्वासाला प्रत्येक सत्रातून बळकटी मिळते. त्या कल्पनाशक्तीला जिवंत ठेवणाऱ्या या व्यासपीठाचा भाग व्हायला मदत करता येणं हा आमचा सन्मान आहे.”
या फेस्टिव्हलमध्ये नोबेल पारितोषिक विजेते वेंकी रामकृष्णन, बुकर पुरस्कार विजेते शेहान करुनातिलका, भारताचे माजी मुख्य सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, शशि थरूर, शोभा डे, जेरी पिंटो, ल्यूक कौंटीन्हो, अनिंदिता घोष, स्वाती पांडे, परमिता वोहरा, तारिणी मोहन यांसारख्या सन्माननीय व्यक्तिमत्वांचा समावेश होता. “लेटर्स टू द फ्युचर” या नावाची एक विशेष जागा उपस्थितांना पुढील पिढीतील वाचक आणि लेखकांसाठी आपली आशा आणि भावना व्यक्त करण्याची संधी देणारी चिंतनशील जागा म्हणून उभी राहिली. विविधता, समावेश आणि सर्जनशीलता, भारतीय ओळखीचा बदलता प्रवास आणि सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी कथनशक्ती यांसारख्या संकल्पना या वर्षीच्या चर्चांचा केंद्रबिंदू होता.
या वर्षीचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे फिक्शन, नॉन-फिक्शन, बिझनेस रायटिंग आणि नाट्यलेखन या विविध श्रेणींमधील उत्कृष्टतेचा गौरव करणारे प्रतिष्ठेचे गोदरेज लिटरेचर लाईव्ह! पुरस्कार. फेस्टिव्हलचे सर्वोच्च सन्मान — पोएट लॉरेट अवॉर्ड आणि लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड — अनुक्रमे सितांशु यशचंद्र आणि विनोद कुमार शुक्ल यांना त्यांच्या उल्लेखनीय साहित्यिक योगदानासाठी प्रदान करण्यात आले.
फेस्टिव्हलच्या सह-संचालिका एमी फर्नांडिस म्हणाल्या: “मुंबई लिटफेस्टच्या 16 व्या वर्षाच्या सत्राची एक शानदार समाप्ती झाली आहे! वाचक आणि लेखकांच्या छोट्या संमेलनाने 15 वर्षांपूर्वी ज्या गोष्टीला सुरुवात केली ते आता कल्पना, विचार आणि पिढ्यांच्या सीमांना ओलांडणाऱ्या उत्साही संवादाच्या व्यासपीठात परिवर्तित झाले आहे. गोदरेज इंडस्ट्रीज या आमच्या भागीदाराच्या पाठबळाने आम्ही या चैतन्याची जोपासना करत आहोत. मुंबई या आपल्या शहराची आणि आपल्या आजूबाजूच्या जगाची सांस्कृतिक नाड खोलवर जोडून साहित्याला सुसंगत, सर्वसमावेशक ठेवत आहोत.”
समावेशनाच्या आपल्या बांधिलकीला पुढे नेत, या वर्षीच्या लिटफेस्टने प्रवेशयोग्यतेच्या, सहजी उपलब्ध होण्याच्या दिशेने एक नवा टप्पा गाठला. अक्सेस फॉर ऑल या संस्थेच्या माध्यमातून 15 पेक्षा अधिक सत्रे भारतीय सांकेतिक भाषा (ISL) मध्ये अनुवादित करण्यात आली. संस्थेने मुलांसाठी झीन-मेकिंग कार्यशाळा आयोजित केली. त्याचा उद्देश सहानुभूती आणि सर्जनशील अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणे हा होता. याशिवाय, ओपन एअर प्लाझा येथे तयार करण्यात आलेल्या सेन्सरी फ्रेंडली टेंटमध्ये न्यूरोडायव्हर्जंट मुलांसाठी आणि इतरांसाठी शांत आणि आरामदायक वातावरण उपलब्ध होते. तिथे स्पर्शानुभूती देणारी सामग्री, मऊ आसनव्यवस्था, नॉईज-कॅन्सलिंग साधने आणि प्रशिक्षित सहाय्यकांचा आधार होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule