
मुंबई, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। मारुती सुजुकी भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारात अधिकृतपणे पदार्पण करत आहे. कंपनीची पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक एसयूव्ही 'ई विटारा’ येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी भारतात लॉंच होणार आहे. खास इलेक्ट्रिक वाहनांसाठी विकसित केलेल्या हार्टेक्ट-ई प्लॅटफॉर्मवर आधारित ही एसयूव्ही गुजरातमधील हंसलपूर कारखान्यात तयार केली जात आहे. याच कारखान्यातून युरोपियन बाजारात आधीच या कारची निर्यात सुरू असून ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि नॉर्वे या देशांमध्ये सुमारे 7,000 युनिट्स पाठवण्यात आल्या आहेत. भारतात लॉंच होणारी आवृत्ती स्थानिक रस्ते व हवामान लक्षात घेऊन अनुकूलित करण्यात आली आहे.
हार्टेक्ट-ई या नव्या प्लॅटफॉर्मवर आधारित ई विटारा हलकी, मजबूत आणि सुरक्षित बांधणीसाठी ओळखली जाते. ग्राहकांसाठी दोन बॅटरी पॅक पर्याय — 49 kWh आणि 61 kWh — उपलब्ध असतील. 49 kWh व्हर्जनमध्ये फ्रंट-माउंटेड मोटर 144 हॉर्सपॉवर निर्माण करते आणि WLTP प्रमाणे 344 किमीपर्यंत रेंज देते. तर 61 kWh बॅटरी असलेले व्हर्जन 174 हॉर्सपॉवर शक्तीसह 428 किमीपर्यंत रेंज देतं. भारतात सुरुवातीला 61 kWh चं दोन चाकांवर चालणारं व्हर्जन उपलब्ध होईल आणि ARAI चाचणीनुसार त्याची रेंज 500 किमीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
डिझाइनच्या बाबतीत, ई विटाराचं स्वरूप EVX कॉन्सेप्टवर आधारित असून ती आक्रमक आणि आधुनिक लूकसह येते. अँगुलर LED हेडलॅम्प्स, सिग्नेचर Y-आकाराचे DRLs, मसलदार बॉडी क्लॅडिंग आणि कनेक्टेड टेललॅम्प्समुळे तिचं रूप आकर्षक दिसतं. इंटिरियरमध्ये 10.1-इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन आणि 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले असलेला ट्विन-स्क्रीन सेटअप दिला आहे. रोटरी गियर सिलेक्टर, अॅम्बियंट लाइटिंग आणि सॉफ्ट-टच डॅशबोर्ड मटेरियल्समुळे केबिनला प्रीमियम अनुभव मिळतो. व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस चार्जिंग, 360-डिग्री कॅमेरा, 10-वे पॉवर एडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि लेव्हल 2 ADAS प्रणाली यासारख्या आधुनिक सुविधा उच्च ट्रिम्समध्ये असतील.
मारुती सुजुकीने ई विटारासोबतच देशभरात EV सपोर्ट नेटवर्क उभारण्याचंही काम सुरू केलं आहे. नेक्सा आउटलेट्सवर DC फास्ट चार्जर्स आणि 1,000 शहरांमध्ये 1,500 हून अधिक EV-रेडी सर्व्हिस सेंटर्स उभारले जात आहेत. यामुळे वाहन मालकांना चार्जिंग आणि मेंटेनन्ससाठी सुलभता मिळणार आहे.भारतीय बाजारात ही एसयूव्ही ह्युंडई क्रेटा इलेक्ट्रिक, टाटा कर्व्ह.ईव्ही, एमजी ZS EV, विनफास्ट VF6 आणि महिंद्रा BE6 सारख्या स्पर्धकांना थेट टक्कर देईल. e विटाराची किंमत अंदाजे 20 लाख रुपयांपासून सुरू होईल आणि टॉप व्हर्जनची किंमत 25 लाखांपर्यंत जाऊ शकते. या लॉंचमुळे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule