
पुणे, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।
पुणे महापालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर करण्यात आली. ही आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर 'कही ख़ुशी, कही गम' अशी परिस्थिती पाहवयास मिळत आहे. या सोडतीनंतर आता कोथरूड भागातील निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पक्षाकडून आता बैठकांचे सत्र सुरू झाले असून कोणासोबत जाऊन महायुती किंवा आघाडी करायचे याबाबतचा अंतिम निर्णय होऊ लागला आहे. त्यातच आता कोथरूड भागातील पाच प्रभागात आरक्षण काय पडले? यापेक्षा उमेदवारी कोणाला मिळणार यासाठी इच्छुकांमध्ये लढाई असणार आहे.कोथरूड विधानसभा मतदारसंघात जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळणार आहे. या ठिकाणी पडलेले आरक्षण पाहता व इच्छुक असलेले उमेदवार वाढल्याने राजकीय गणिते येत्या काळात बदलणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठी चुरस पहावयास मिळणार आहे. विशेषतः पुण्यात महायुती व महाविकास आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्रत्येकाला त्याची उत्सुकता लागली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु