
नांदेड, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।
ऑगस्टच्या महापुरात मुखेड तालुक्यातील (जि.नांदेड) हसनाळ गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले. संसार, जनावरे, धान्य, शेती – सर्व काही वाहून गेले. त्या रात्री संतोष सुभेदार आणि त्याचे कुटुंब जीव वाचवण्यासाठी अंगावरील कपड्यांनिशी डोंगरावर आसरा घेऊन गेले.
पुनर्वसनानंतर छोट्याशा घरात नव्याने संसार उभा करण्याचा प्रयत्न सुरू होता… पण नियतीने अजून काहीतरी वेगळंच लिहून ठेवलेलं होतं. यापेक्षा मोठे संकट समोर येईल याची तसूभर कल्पना सुद्धा या कुटुंबास नव्हती.
१० सप्टेंबर रोजी घरात ठेवलेला पेट्रोलचा डबा हातातून घसरला आणि दिव्याच्या ज्योतीमुळे क्षणात आग लागली. क्षणार्धात सर्व काही भस्मसात झालं. पत्नी अर्चना आणि १४ वर्षांचा मुलगा हनुमंत गंभीर भाजले. संतोषने दोघांना वाचवण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न केला – पण तो स्वतःही भाजला. लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान अर्चना आणि हनुमंत या दोघांचा मृत्यू झाला…
आज संतोष अजूनही उपचार घेत आहे. संसार, व्यवसाय, कुटुंब — सर्व काही गमावलेल्या या माणसाच्या चेहऱ्यावर आजही एकच प्रश्न होता –“आता पुढे काय?”
महापुराने उध्वस्त झालेल्या गावातील लोकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख यांनी गावास भेट दिली असता संतोष आणि त्याची वृध्द आई यांनी हा दुखःद प्रसंग सांगितला. संस्थेने गांभीर्य ओळखून पुढाकार घेत ‘केअरिंग फ्रेंड्स, मुंबई’ या संस्थेकडे मदतीसाठी विनंती केली. त्यांनीही मानवतेचा हात पुढे करत संतोषच्या उपचारासाठी ₹८०,००० ची आर्थिक मदत दिली.
संस्थेचे चेअरमन श्री. प्रमोद देशमुख यांनी हसनाळ येथे जाऊन संतोषची नुकतीच विचारपूस केली आणि धनादेश सुपूर्द केला.
संवेदना, साथ आणि सहकार्य – हाच जीवनाचा खरा अर्थ आहे हेच या कृतीतून अधोरेखित केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis