
पुणे, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। पुणे जिल्हा परिषदेने सर्व्हिकल कॅन्सर मुक्त पुणे जिल्हा हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पारगाव येथे महिलांची आरोग्य तपासणी केली. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस कॅन्सरचा आजार वाढतोय. त्या दृष्टीने प्रतिबंध म्हणून आजचा उपक्रम घेण्यात आला. पारगावमधील महिलांनी या उपक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.दौंड येथे एकल महिलांसाठी कॅन्सरविषयक आरोग्य तपासणी शिबिर झाले. या एकल महिला शिबिरामध्ये एकूण ४७० महिलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्वच्या सर्व महिलांची हिमोग्लोबिन तपासणी, १८८ महिलांची नेत्रतपासणी, ५३ महिलांची ईसीजी तपासणी, ४७० महिलांची एनसीडी तपासणी, ७२ महिलांना गोल्डन कार्ड आणि २२ महिलांची गर्भाशय तपासणी करण्यात आली.शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र, नानगाव यांच्या वतीने केले होते. शिबिराचे उद्घाटन सरपंच सुभाष बोत्रे यांच्या हस्ते झाले. या वेळी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी संजय शिंदे, ग्रामविकास अधिकारी मुरलीधर बडे, डॉ. भरत खळदकर आदी उपस्थित होते. सर्व तपासण्या नानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित भंडलकर, डॉ. अनिकेत उघडे पाटील यांनी केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु