
पुणे, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।
:पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासाठी करण्यात आलेली जमीन मोजणी आणि त्यासाठी देण्यात येणाऱ्या मोबदल्याच्या रकमेचा तपशील असलेला अहवालराज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या अहवालाला मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून जमिनीच्या मोबदल्याची रक्कम निश्चित होऊन त्याच्या वाटपाचे वेळापत्रक निश्चित होणार आहे. या महिनाअखेर या शेतकऱ्यांना देण्यात येणार मोबदल्याची रक्कम ठरेल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.या भूसंपादनासाठी अंदाजे पाच हजार कोटी रुपये लागतील, असे डुडी यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. यासाठी सात गावांतील १ हजार २८५ हेक्टर, अर्थात तीन हजार एकर भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यातील सुमारे ३ ते ४ टक्के जमीन अद्याप ताब्यात आलेली नाही. हे क्षेत्र सुमारे ५० हेक्टर असून, नकाशाच्या बाहेरील सुमारे २४० हेक्टर क्षेत्र देण्यास शेतकऱ्यांनी संमती दिली असल्याचे डुडी यांनी सांगितले. या संमती मिळालेल्या जमिनीच्या मोजणीचे काम आता पूर्ण झाले आहे. त्याचा सविस्तर अहवाल पूर्ण करण्यास निर्धारित वेळेपेक्षा एका आठवडा जास्त लागला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु