“झाशीच्या राणीचे चित्र नव्हे, चरित्र हवे” – चैताली खटी
नागपूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.) : इंग्रजांच्या परकीय सत्तेविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचे जीवनकार्य अलौकिक असून तिचे मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच देशभरात तिचे पुतळे उभारले गेले असले, तरी आजच्या काळात
चैताली खटी


नागपूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.) : इंग्रजांच्या परकीय सत्तेविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचे जीवनकार्य अलौकिक असून तिचे मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच देशभरात तिचे पुतळे उभारले गेले असले, तरी आजच्या काळात तिच्या ‘चित्रा’सोबतच ‘चरित्राची’ गरज असल्याचे मत राष्ट्रचरित्र प्रबोधक चैताली खटी यांनी व्यक्त केले.

नागपूरच्या मनीषनगर येथील सन्मती उद्यानात आयोजित दिवाळी मिलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ‘केशव जागरण समिती’तर्फे आयोजित या कार्यक्रमात झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात चैताली खटी यांनी स्वतः झाशीच्या राणीच्या वेशभूषेत गीत, कविता आणि श्लोकांच्या माध्यमातून राणीच्या शौर्याचा उत्कट आविष्कार केला. याप्रसंगी खटी म्हणाल्या की, झाशीची राणी लक्ष्मीबाई ही फक्त एक व्यक्ती नव्हे, तर ती एक शक्ती होती. अवघ्या 28 वर्षांच्या आयुष्यात मातृवियोग, दारिद्र्य, पुत्रवियोग आणि वैधव्याचे दुःख सोसूनही राणीने स्वाभिमान आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व पणाला लावले.”त्यांनी पुढे सांगितले की, आज तिच्या पुतळ्यांना आणि चित्रांना आपण वंदन करतो, पण तिचे चरित्र आत्मसात करण्याची खरी गरज आहे.

राणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मनिकर्णिका मोरोपंत तांबे होते. त्यांचे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गुढे गावचे होते. पेशवाई संपल्यानंतर मोरोपंत तांबे उत्तर भारतात स्थायिक झाले आणि काशी येथे 19 नोव्हेंबर 1828 रोजी मनिकर्णिकाचा जन्म झाला.

बालपणीच आईचे छत्र हरपलेल्या मनिकर्णिकाने नानासाहेब पेशवे व तात्या टोपे यांच्या संगतीत युद्धकलेचे धडे घेतले. नंतर तिचा विवाह झाशीचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. पतीच्या निधनानंतर तिने झाशीच्या गादीवर बसून प्रशासनाची धुरा सांभाळली. इंग्रजांविरुद्ध ती रणांगणात उतरली आणि मातृभूमीसाठी प्राणार्पण केले. राणीचे जीवन आपल्याला धैर्य, आत्मविश्वास, स्वाभिमान, त्याग आणि देशप्रेम शिकवते. स्त्रिया केवळ घरापुरत्या मर्यादित नाहीत, तर रणांगणातही पराक्रम गाजवू शकतात, हे राणीने सिद्ध केले. तिचे विचार आत्मसात केल्यास आजच्या पिढीत नवी ऊर्जा निर्माण होईल असे खटी यांनी सांगितले.

प्रबोधनाचा समारोप करताना खटी यांनी भारतीय समाजातील भित्रेपणावरही टीका केली. “आपला मुलगा पाठीशी बांधून रणांगणात उतरणाऱ्या त्या वीरांगनेला शेवटच्या क्षणी इंग्रजांच्या धाकाने भारतीयांकडूनच आधार मिळाला नाही. तिला आपल्या वंशाचा दिवा दामोदर याला गंगादास बाबांकडे सोपवून देहत्याग करावा लागला ही शोकांतिका आहे. आजच्या पिढीने तिच्या त्यागातून प्रेरणा घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande