
अमरावती, 12 नोव्हेंबर (हिं.स.)
निम्न पेढी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील मौजे सावरखेड (ता. भातकुली, जि. अमरावती) येथे जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या सिमेंट रोडच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या कामासंदर्भात दुर्गाप्रसाद तिवारी (रा. गल्ली नं. ६, आसरा माता मंदिराजवळ, अमरावती) यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये सविस्तर माहिती मागितली आहे.
अर्जदाराने २०२० ते २०२५ या कालावधीत सावरखेड गावात करण्यात आलेल्या सिमेंट रोडच्या बांधकामाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता, इस्टीमेट, नकाशे, मंजुरीच्या प्रती तसेच खर्चाचा तपशील मागविला आहे. बुडीत क्षेत्रात हे बांधकाम करण्यात येत असल्याने, या कामासाठी पाटबंधारे विभागाची अनुमती घेण्यात आली होती का, याबाबतही संपूर्ण कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे.तसेच या रस्त्याच्या कामासाठी मंजूर अंदाजपत्रक, आतापर्यंत झालेला खर्च, काम करणाऱ्या ठेकेदाराचे नाव, तसेच त्यांना देण्यात आलेल्या बिलांची माहिती अर्जदाराने मागविली आहे. या संदर्भात तिवारी यांनी शंका उपस्थित केली आहे की, “बुडीत क्षेत्रात रस्ता बांधकाम करून शासन निधीचा गैरवापर व भ्रष्टाचार होत आहे काय?” याची चौकशी व्हावी आणि दोषी अधिकारी व संबंधितांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी