
नांदेड, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।
“प्रत्येक माणसाने अंतर्मुख होऊन माणुसकी, देशप्रेम, सेवाभाव, समाजहित, मनमिळाऊपणा आणि प्रामाणिक परिश्रमाची वृत्ती जोपासली, तर आपला देश जगासमोर आदर्श ठरेल, असे संघ प्रचारक जयंत रानडे यांनी सांगितले
स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भाषणाच्या स्मरणार्थ आयोजित शिकागो भाषण पाठांतर स्पर्धेचे परीक्षण प्रमुख म्हणून श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, सगरोळी येथे श्री जयंत रानडे हे संस्थेत आले होते.
या स्पर्धेत हायस्कूल विभागातील एकूण 134 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या चार भाषांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे भाषण पाठांतर सादर केले.
स्वामी विवेकानंद विचार प्रसारक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्री जयंत रानडे हे महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात 29 वर्षे अभियंता म्हणून कार्यरत राहिले असून सेवानिवृत्तीनंतर गेली 23 वर्षे “कुटुंब प्रबोधन”, कुटुंब कल्याण व समुपदेशन या विषयांवर कार्यरत आहेत. त्यांनी देशभरातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे अनेक व्याख्यानमालेद्वारे कार्य केले आहे.
या भेटीत त्यांनी संस्कृती संवर्धन मंडळ संचलित सगरोळी येथील विविध शैक्षणिक संस्थांना भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संस्थेच्या विविध शाखांचे, उपक्रमांचे व प्रकल्पांचे अवलोकन करून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि मौल्यवान मार्गदर्शनपर सूचना दिल्या.
आपल्या संवादात त्यांनी कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या समाजोन्नतीच्या कार्याचा उल्लेख करून संस्थेच्या सातत्यपूर्ण योगदानाचे अभिनंदन केले.
संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व संस्था कार्यकर्त्यांना त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर आधारित प्रेरणादायी मार्गदर्शन दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis