
अमरावती, 12 नोव्हेंबर (हिं.स.)
येत्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिल्याने अमरावतीच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून युवा स्वाभिमान स्वबळावर अशी घोषवाक्ये असलेले पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यातून भाजपसोबतच्या संभाव्य युतीला पूर्णविराम मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष गेल्या काही वर्षांपासून स्वतंत्र भूमिकेत कार्यरत आहे. मात्र, त्यांच्या पत्नी नवनीत राणा या भाजपसोबत राजकीय समन्वयात असल्याने युतीबाबतची चर्चा वेगाने सुरू होती. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा रवी राणा यांच्यासोबत युतीस विरोध असल्याचे समोर आल्यानंतर अखेर युवा स्वाभिमान पक्षाने स्वबळाचा मार्ग स्वीकारल्याचे स्पष्ट होत आहे.अमरावती जिल्ह्यातील अनेक नगरपरिषदांमध्ये युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते सक्रिय असून, काही ठिकाणी त्यांनी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. पक्षाकडून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या जात आहेत.रवी राणा यांनी युवा स्वाभिमान पक्ष जनतेच्या शक्तीवर विश्वास ठेवतो. आमचा पक्ष स्वबळावर लढून जनतेचा पाठिंबा मिळवेल, असे वक्तव्य केल्याचे समजते. या घोषणेने महाविकासआघाडी आणि भाजप-शिवसेना या दोन्ही आघाड्यांच्या समीकरणात नवीन घडामोडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राजकीय विश्लेषकांच्या मते, रवी राणा यांच्या या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर तिरंगी लढती रंगण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी