आरक्षण सोडतीने रंगला पनवेलचा राजकीय पट — नागरिकांचा मोठा प्रतिसाद!
रायगड, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आरक्षण निश्चितीची सोडत सोमवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोडत पार पडली असून, निवडणूक प्रक्रिये
आरक्षण सोडतीने रंगला पनवेलचा राजकीय पट — नागरिकांचा मोठा प्रतिसाद!


रायगड, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आरक्षण निश्चितीची सोडत सोमवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोडत पार पडली असून, निवडणूक प्रक्रियेला आता अधिकृत सुरुवात झाल्याचं चित्र दिसत आहे.

या सोडतीमध्ये एकूण 20 प्रभागांसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण (महिला) या प्रवर्गांनुसार आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षण सोडतीनंतर अनेक प्रभागांतील राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कार्यक्रमास अतिरीक्त आयुक्त (1) गणेश शेटे, अतिरीक्त आयुक्त (2) महेशकुमार मेघमाळे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त नानासाहेब कामठे, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, सचिव अक्षय कदम, कार्यकारी अभियंता सुधीर सांळुखे, आरेखक नितीन हुद्दार, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सोडतीदरम्यान नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला. प्रभाग आरक्षण जाहीर होताच उमेदवार व राजकीय पक्षांनी आपापल्या गणितांची जुळवाजुळव सुरू केली आहे. प्रारूप आरक्षणाबाबत हरकती व सूचना नोंदविण्यासाठी 17 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे, तर 24 नोव्हेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. या हरकतींचा विचार करून 2 डिसेंबर 2025 रोजी अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.या सोडतीनंतर पनवेल महानगरपालिका निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया वेग घेत असून, पुढील काही दिवसांत राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande