
रत्नागिरी, 12 नोव्हेंबर, (हिं. स.) : गुहागरच्या भंडारी हॉलमध्ये झालेल्या प्रदीप परचुरे व कॅरम लव्हर्स ग्रुप आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या सागर वाघमारेने ठाण्याच्या पंकज पवारवर २५-२१, २५-१९ अशी सहज मात करून गटाचे विजेतेपद पटकावले, तर तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत मुंबईच्या विकास धारियाने मुंबईच्या नीलांश चिपळूणकरला ७-२५, २५-१०, २५-१३ असे हरवले.
महिला एकेरीच्या अंतिम फेरीत ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला रंगतदार लढतीत २१-२५, २४-५ व २२-२० असे हरवून या गटाचे विजेतेपद पटकावले. तिसरा क्रमांक प्राप्त करताना मुंबईच्या सोनाली कुमारीने मुंबईच्या रिंकी कुमारीला २५-१३, २५-११ असे हरवले.
विजेत्या खेळाडूंना आयोजक प्रदीप परचुरे परिवार, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, उपाध्यक्ष यतिन ठाकूर, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, सचिव मिलिंद साप्ते यांच्या हस्ते रोख पारितोषिके, प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले.
महिला एकेरी उपांत्य फेरीचे निकाल असे -
समृद्धी घाडीगावकर (ठाणे) विजयी विरुद्ध रिंकी कुमारी (मुंबई) २५-२३, २५-१
आकांक्षा कदम (रत्नागिरी) वि. वि. सोनाली कुमारी ( मुंबई ) १२-२१, २५-२१, १९-१६
पुरुष एकेरी उपांत्य फेरीचे निकाल -
सागर वाघमारे (पुणे) वि. वि. नीलांश चिपळूणकर (मुंबई) २२-१६, ३-२५, २५-२
पंकज पवार (ठाणे) वि. वि. विकास धारिया (मुंबई) २५-११, २१-७
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी