रत्नागिरी : खल्वायनच्या मासिक संगीत सभेत गानहिरा सावनी पारेकरचे बहारदार गायन
रत्नागिरी, 12 नोव्हेंबर, (हिं. स.) : येथील खल्वायन संस्थेच्या 319 व्या मासिक संगीत सभेत मुंबईची गानहिरा युवा गायिका कु. सावनी सचिन पारेकर हिच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच अभंग- नाट्यगीतांच्या बहारदार सादरीकरण झाले. या कै. संजय मुळ्ये आणि कै. मं
खल्वायनची 319 वी मासिक संगीत सभा रंगविताना गानहिरा सावनी पारेकर. सोबत  तबलासाथ प्रथमेश शहाणे, हार्मोनियम साथ अमित ओक


रत्नागिरी, 12 नोव्हेंबर, (हिं. स.) : येथील खल्वायन संस्थेच्या 319 व्या मासिक संगीत सभेत मुंबईची गानहिरा युवा गायिका कु. सावनी सचिन पारेकर हिच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच अभंग- नाट्यगीतांच्या बहारदार सादरीकरण झाले.

या कै. संजय मुळ्ये आणि कै. मंदाकिनी कान्हेरे स्मृती मासिक संगीत सभेत सौ. शिवाली पारेकर व श्रीमती अनिता आगाशे यांचे हस्ते नटराजपूजन, दीप प्रज्वलन झाले. श्रीनिवास जोशी यांनी प्रास्ताविक करून कलाकारांची ओळख करून दिली. मनोहर जोशी यांनी कलाकारांना सन्मानित केले.

मैफिलीची सुरवात सावनी हिने पूरिया रागातील विलंबित तिलवाडा तालात निबद्ध असलेल्या मलनिया गुंध लाओ या बड्या ख्यालाने केली. त्यानंतर मध्य लयीतील एक बंदिश व त्यानंतर एक तालातील तराणा व मिश्र खमाजमधील दादरा तिने सादर केला. त्यानंतर आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, राम होऊनी राम गा रे, नंतर माणिकताई वर्मा यांची विजयी पताका श्रीरामाची, त्या चित्त चोरट्याला ही गाणी नंतर संगीत मत्स्यगंधा नाटकातील देवाघरचे ज्ञात कुणाला, संगीत भूमिकन्या सीतामधील मी पुन्हा वनांतरी ही नाट्यपदे व शेवटी भैरवीतील पदाने तिने आपल्या मैफलीचा शेवट केला.सहजतेने घेतलेल्या सफाईदार,अवघड पण तेवढ्याच मधुर आलाप ताना, गीतांची वैविध्यपूर्ण निवड आणि सुरेल मधुर आवाज यामुळे सावनीचे गायन रंगतदार झाले. कार्यक्रमाला तबलासाथ रत्नागिरीतील प्रथमेश शहाणे, हार्मोनियमसाथ चिपळूणमधील प्रसिद्ध वादक सीए अमित ओक यांनी तेवढीच समर्पक करून कार्यक्रमात रंगत आणली. मैफल यशस्वितेसाठी सीमा मुळ्ये, अनिता आगाशे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, गोदूताई जांभेकर विद्यालय, संजय बर्वे, दिलीप केळकर, इत्यादींचे सहकार्य लाभले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande