
नवी दिल्ली , 12 नोव्हेंबर (हिं.स.)। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या देशात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण, त्यांनी यासाठी काही अटी घातल्या आहेत. शेख हसीना यांनी सांगितले आहे की, त्यांची घरी परतण्याची अट म्हणजे “सहभागी लोकशाही”ची पुनर्स्थापना, अवामी लीगवरील बंदी उठविणे आणि स्वच्छ, निष्पक्ष व सर्वसमावेशक निवडणुका आयोजित करणे आहे. या पार्श्वभूमीवर आता शेख हसीना यांनी देशात परतण्याची चर्चा केली आहे.
सध्या भारतात एका गुप्त ठिकाणी वास्तव्यास असलेल्या शेख हसीना यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी सध्याचे अंतरिम सरकार आणि त्यांचे प्रमुख मुहम्मद युनूस यांच्यावर भारताशी असलेले संबंध खराब करण्याचा आणि अतिरेकी घटकांना प्रोत्साहन देण्याचा आरोप केला. त्यांच्या परराष्ट्र धोरणाची तुलना अंतरिम सरकारशी करताना, त्या म्हणाल्या की, ढाका आणि नवी दिल्ली यांच्यातील विस्तृत आणि खोल संबंधांमुळे युनूस यांच्या मूर्ख कृत्यांचा ठामपणे प्रतिकार केला पाहिजे. शेख हसीना यांनी आश्रय दिल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले. बांगलादेशात परतण्यासाठी त्यांची प्राथमिक अट बांगलादेशी लोकांची इच्छा आहे हे स्पष्ट केले. सहभागी लोकशाहीची पुनर्स्थापना. अंतरिम प्रशासनाने अवामी लीगवरील बंदी उठवावी आणि मुक्त, निष्पक्ष आणि समावेशक निवडणुका घ्याव्यात, असे त्यांनी म्हटले आहे.
बांगलादेशच्या सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेल्या हसीना, या काही आठवड्यांच्या हिंसक सरकारविरोधी निदर्शनांनंतर ५ ऑगस्ट २०२४ रोजी देश सोडून गेल्या. मोठ्या आंदोलनाच्या दबावाखाली, त्यांना राजीनामा द्यावा लागला. यामुळे युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन होण्यास मदत झाली. या भयानक घटनांमधून बरेच धडे शिकले आहेत यावर त्यांनी भर दिला. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केल्याचा दावा करणारे वृत्त हसीना यांनी स्पष्टपणे फेटाळून लावले. अवामी लीगशिवाय कोणतीही निवडणूक कायदेशीर ठरणार नाही असे त्या म्हणाल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode