
मुंबई, 12 नोव्हेंबर, (हिं.स.)। 'सन मराठी'वर 'मी संसार माझा रेखिते' या मालिकेचा प्रोमो पाहताच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणारी, कोणतीच अपेक्षा न ठेवता नात्यांना जपणारी अनुप्रिया १ डिसेंबर पासून रोज रात्री ९:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रोमोमध्ये उत्कृष्ट कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. मुख्य अभिनेत्री दीप्ती केतकरसह, हरीश दुधाडे, आभा बोडस, संजीवनी जाधव, प्रणिता आचरेकर, संदीप गायकवाड आणि दीप्ती सोनावणे मालिकेची रंगत वाढवण्यासाठी सज्ज आहेत.
मालिकेचा विषय प्रत्येक गृहिणीला आपलंस करून घेणारा आहे. याचसह मालिकेत मायलेकीचं घट्ट नातं पाहायला मिळतंय. 'जोडायचं ठरवलं तर सगळं जोडता येतं' या सुंदर तत्त्वावर मालिका आधारित आहे. प्रोमोला मिळालेल्या प्रतिसादावरून मालिकेला भरपूर प्रेम मिळेल अशी खात्री वाटते. याचसह खास करून गृहिणींना मालिकेचं नाव प्रचंड आवडलं असल्याच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
मालिकेत अनुप्रिया ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीप्ती केतकर भूमिकेविषयी सांगताना म्हणाल्या की, 'मी संसार माझा रेखिते' या मालिकेसाठी खूप उत्सुक आहे. काहीकाळ मी अश्याच भूमिकेची वाट पाहत होते. या मालिकेतील अनुप्रिया अगदी तशीच आहे. स्वतःच्या कुटुंबावर असलेलं प्रेम, त्यांची काळजी या सगळ्यात अनुप्रिया तिची स्वप्न बाजूला ठेवून कुटुंबासाठी प्रत्येक गोष्ट आवडीने करते. या गोष्टीचा तिला कुठेच त्रास होत नाही. अनुप्रिया आणि माझ्यात एकच फरक आहे की, मला माझ्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे. अनुप्रियाच्या बाबतीत तसं नाहीये. या मालिकेसाठी माझ्या सासूबाई, नवरा व मुलगी माझ्यापेक्षा जास्त खुश आहेत. सासूबाईंनी मला ठणकावून सांगितलं आहे की, आता पूर्णपणे कामाकडे लक्ष दे आमची काळजी करू नकोस.
या पुढे दीप्ती केतकर म्हणाल्या की, माझ्यासाठी मुलीकडून आई तू खूप छान काम करते हे वाक्य ऐकणं कोणत्याही अवॉर्डपेक्षा मोठ आहे. मालिकेत अनुप्रियाची मुलगीही तिच्या मागे खंबीर उभी असते. या बरोबरच आमची टीम खूप जबरदस्त आहे. त्यामुळे काम करायला मज्जा येईल. हळूहळू अनुप्रियाच्या प्रत्येक छटा मला जाणून घ्यायच्या आहेत. ही मालिका प्रत्येक गृहिणीला आपलीशी वाटेल ही खात्री आहे. प्रत्येक मालिकेनंतर मी कुटुंबासाठी ब्रेक घेत असते पण आता मी थांबणार नाही. प्रेक्षकांना इतकंच सांगेन की, अनुप्रियाला भरभरून प्रेम व आशीर्वाद द्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर