
रायगड, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। पनवेल महानगरपालिका निवडणूक 2025 च्या आरक्षण सोडतीनंतर राजकीय वातावरण तापले असून इच्छुकांची मांदियाळी दिसून येतेय. आरक्षणाच्या निकालानंतर अनेक दिग्गजांना दिलासा मिळाल्याचं चित्र आहे.
पालिका क्षेत्रातील २० प्रभागांपैकी तळोजा प्रभाग क्र.१ मधील माजी नगरसेवक हरेश केणी हे काँग्रेसकडे वळल्याने ते पुन्हा रिंगणात उतरणार अशी चर्चा आहे. खारघर प्रभागातील माजी नगरसेविका लीना गरड यांनी आरक्षण कायम राहिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कामोठे प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव ठरल्याने माजी नगरसेवक गायकवाड यांच्या पुनरागमनाची शक्यता आहे.
कळंबोली प्रभागात राष्ट्रवादीचे सतीश पाटील, शिवसेनेचे रामदास शेवाळे आणि बबन मुकादम यांच्यात काटे की टक्कर अपेक्षित आहे. तर शेवाळे यांच्या पत्नी सायली सरकही तयारीत आहेत. प्रभाग क्र.७ मध्ये महिलांचे वर्चस्व पाहायला मिळेल. भाजपचे अमर पाटील, काँग्रेसचे सुदाम पाटील, शिवसेना (ठाकरे गट) चे प्रदीप ठाकूर आणि शेकापचे चंद्रकांत राऊत हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.प्रभाग क्र.१० मध्ये शेकापमधून भाजपात गेलेले रवींद्र चव्हाण पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. तर प्रभाग क्र.१८,१९ मध्ये भाजपचे परेश ठाकूर यांचा मार्ग मोकळा असून ॲड. प्रथमेश सोमण हे प्रबळ दावेदार आहेत.नवीन पनवेल प्रभाग क्र.१७ मध्ये ॲड. प्रकाश बिनेदार यांची उमेदवारी निश्चित झाली असून, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील व ॲड. मनोज भुजबळ यांच्यात स्पर्धा रंगणार आहे.खांदा कॉलनी प्रभागात माजी उपमहापौर सीता पाटील आणि एकनाथ गायकवाड हे प्रमुख दावेदार आहेत. या सर्व घडामोडींमुळे महायुती आणि महाआघाडी दोन्हींकडे उमेदवार निवड करताना मोठी डोकेदुखी निर्माण होणार आहे, हे नक्की!
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके