
वॉशिंग्टन, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने व्हिसासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या अंतर्गत अमेरिकन व्हिसा मिळवण्यासाठी आणि तिथे राहण्यासाठी परदेशी नागरिकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ट्रम्प प्रशासनाने परदेशातील अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावासातील अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, व्हिसा अर्जदारांची पूर्ण चौकशी करण्यात यावी, जेणेकरून हे निश्चित करता येईल की ते अमेरिकेत सरकारी मदतीवर अवलंबून नसतील.
नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अर्जदारांचे वय, आरोग्य, कौटुंबिक स्थिती, आर्थिक परिस्थिती, शिक्षण, कौशल्य आणि इंग्रजी बोलण्याची क्षमता यांसारख्या अनेक घटकांचे मूल्यमापन करण्यास सांगितले आहे. विशेषतः मधुमेह, स्थूलता (लठ्ठपणा), उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा मानसिक आरोग्याच्या समस्या असलेले लोक व्हिसासाठी अयोग्य ठरू शकतात.
अधिकाऱ्यांना अर्जदारांचे बँक दस्तऐवज, मालमत्ता, गुंतवणूक आणि निवृत्तीवेतन खात्यांचीही तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, या पावलामुळे व्हिसा मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते आणि अमेरिकेत आधीपासून राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांसाठीही अडचणी वाढू शकतात.
अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्याने सांगितले की, “अमेरिकेचे हितसंबंध प्रथम येतात आणि ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे याची खात्री करतील की अमेरिकन करदात्यांवर अतिरिक्त भार पडणार नाही.” तथापि, या मार्गदर्शक तत्त्वाचा परिणाम मोठ्या प्रमाणात वाणिज्य दूतावासातील अधिकाऱ्यांच्या अर्थ लावण्यावर अवलंबून असेल. दरम्यान, तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की ही धोरण धोकादायक ठरू शकते आणि त्यामुळे अमेरिकेत कायदेशीररीत्या राहणाऱ्या कुटुंबांमध्ये सरकारी मदत घेण्याबाबत भीती आणि संभ्रम निर्माण होऊ शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode