
रत्नागिरी, 12 नोव्हेंबर, (हिं. स.) : सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी उपक्रमात वसंत आबाजी डहाके यांचे व्याख्यान रत्नागिरी येत्या 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
राज्य मराठी विकास संस्था प्रायोजित आणि आर्ट सर्कल आयोजित सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी उपक्रमाच्या पुढच्या टप्प्याच्या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांची उपस्थिती लाभणार आहे.
गेली सुमारे सहा दशके मराठी कवितेच्या प्रांतात विलक्षण निर्मिती करत आलेले ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांचे स्वतःच्या कवितेविषयीचे चिंतन ऐकण्याची दुर्मिळ संधी रत्नागिरीकरांना १४ नोव्हेंबर २०२५ रोजी (शुक्रवारी) मिळणार आहे. हा कार्यक्रम शर्वाणी हॉलमध्ये सायंकाळी 7.00 वाजता होणार आहे.
कविता का लिहिली जाते, कशी लिहिली जाते, तिच्यावरचे अंतर्बाह्य प्रभाव कोणते असतात, याबद्दल अनुभव आणि अभ्यास यांमधून आलेले विचार डहाके या वेळी मांडणार आहेत. चित्रलिपी या त्यांच्या काव्यसंग्रहासाठी त्यांना ‘साहित्य अकादमी’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच चंद्रपूर येथे 2012 साली झालेल्या ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही डहाके त्यांनी भूषवले आहे. कवितेव्यतिरिक्त त्यांचे समीक्षा, कादंबरी, कोश अशा साहित्यप्रकारांमधील योगदानही मोलाचे मानले जाते. योगभ्रष्ट, चित्रलिपी, शुभवर्तमान, शुनःशेप इत्यादी त्यांच्या पुस्तकांनी आजवर मराठी वाचकांना बौद्धिक मेजवानी दिली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने डहाके यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ समीक्षक व कवयित्री प्रभा गणोरकर उपस्थित राहणार आहे.
साहित्यरसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून यावे, असे आवाहन आर्ट सर्कलच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी