


मुंबई, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। यामाहा मोटर इंडियानं आपल्या प्रसिद्ध ‘एफजेड’ मालिकेत नवीन एफजेड Rave ही दमदार मोटरसायकल सादर केली असून, तिची किंमत 1.17 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर XSR 155 या नवीन नो-रेट्रो बाइकलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. 1.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीची ही बाइक क्लासिक आणि आधुनिक डिझाइनचा परिपूर्ण संगम आहे. यामाहाच्या या लाँचमुळे कंपनीचा भारतीय बाजारातील प्रभाव अधिक वाढेल.
आधुनिक आणि आक्रमक डिझाइनसह आलेली ही बाइक कंपनीच्या लोकप्रिय FZ फॅमिलीला नवसंजीवनी देईल, असं दिसतं. नवीन FZ Rave विशेषतः युवा रायडर्ससाठी डिझाइन केली गेली आहे. तिचा हेडलॅम्प युनिट आकर्षक LED तंत्रज्ञानासह सजला असून, रात्रीच्या वेळी उत्तम दृश्यमानता देतो. मसल फ्युएल टँक, व्हेंटसारखे पॅनेल्स आणि सिंगल-पीस सीटमुळे बाइकला स्पोर्टी आणि आरामदायी स्वरूप मिळतं. रंग पर्यायांमध्ये मॅट टायटॅन आणि मेटॅलिक ब्लॅक हे दोन पर्याय उपलब्ध आहेत, जे विशेषतः तरुण ग्राहकांना आवडतील.
बाइकमध्ये नेगेटिव्ह LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलं आहे, जे स्पीडोमीटर, फ्युएल गेज आणि ट्रिप मीटरसह सर्व माहिती स्पष्टपणे दाखवतं. सस्पेन्शनसाठी फ्रंटला टेलिस्कोपिक फोर्क आणि रियरला मोनोशॉक सेटअप असून, दोन्ही एंडवर सिंगल डिस्क ब्रेक्स आणि ABS पर्याय देण्यात आला आहे. 149 सीसी एअर-कूल्ड इंजिन असलेली ही बाइक 12 हॉर्सपॉवर आणि 13.3 Nm टॉर्क निर्माण करते. पाच-स्पीड गिअरबॉक्ससह ती सिटी आणि हायवे दोन्हीसाठी योग्य आहे. सुमारे 45–50 किमी प्रतिलिटर इतकं मायलेज मिळण्याची शक्यता आहे.
XSR 155 बाइक मध्ये गोलाकार LED हेडलॅम्प, फ्लॅट सीट आणि टीअरड्रॉप टँक यामुळे तिचा रेट्रो लूक अधिक उठून दिसतो. XSR 155 मध्ये 155 सीसी, सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन असून, ते 18.4 एचपी पॉवर आणि 14.1 एनएम टॉर्क निर्माण करतं. 6-स्पीड गिअरबॉक्ससह हे इंजिन स्मूथ आणि रेस्पॉन्सिव्ह रायडिंग अनुभव देतं. ब्लू कोर टेक्नॉलॉजीमुळे इंधन बचत आणि कमी प्रदूषण हे तिचे मोठे फायदे आहेत. या बाइकमध्ये पूर्ण LED लाइटिंग, LCD डिजिटल क्लस्टर, ट्रॅक्शन कंट्रोल आणि मोटरसायकल कनेक्ट सिस्टीमसारखी प्रगत वैशिष्ट्यं देण्यात आली आहेत. सेफ्टीसाठी ड्युअल-चॅनेल ABS असून, ती विविध रस्त्यांवर अधिक स्थिरता देते.
या सर्व लाँचेसमुळे यामाहा कंपनीनं भारतातील दुचाकी बाजारात आपला स्पोर्टी आणि इलेक्ट्रिक सेगमेंट मजबूत केला आहे. TVS, बजाज आणि होंडा सारख्या कंपन्यांना यामुळे तगडं स्पर्धात्मक आव्हान मिळेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule