
मुंबई, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर येतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने सूक्ष्म नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.
या बैठकीस अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, अपर विभागीय आयुक्त कोकण सिद्धराम सालीमठ, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल, नगरविकास विभागाच्या सहसचिव विद्या हम्पय्या, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले, चैत्यभूमी परिसरात मंडप व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दादर व आसपासच्या परिसरात वाहतूक पोलीस यंत्रणांनी रहदारीचे योग्य नियोजन आणि नियंत्रण करावे. अनुयायांना मार्गदर्शन मिळावे यासाठी जागोजागी सूचना फलक लावावेत. प्रत्येक विभागाने त्यांची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भोजन व्यवस्था, आरोग्य सुविधा, सुरक्षाव्यवस्था, पिण्याचे पाणी, शौचालय सुविधा, परिसर स्वच्छता, सीसीटीव्हीची व्यवस्था, विद्युतव्यवस्था, पुस्तकांचे स्टॉल, तसेच शासकीय जाहिरात व प्रसिध्दी या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने श्री. कांबळे यांनी विविध मागण्या मांडल्या. यावेळी महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर