
पुणे, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील मतदार नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार १० डिसेंबर पर्यंत नाव नोंदविणाऱ्या अर्जांवर निर्णय घेऊन पात्र मतदारांचा समावेश ३० डिसेंबर रोजीच्या अंतिम मतदार यादीमध्ये करण्यात येणार आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभाग पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघातून पुढील वर्षी अपेक्षित असलेल्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार नाव नोंदणीसाठी सहा नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती.
सहा नोव्हेंबर पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांबाबत पात्र-अपात्रतेचा निर्णय घेऊन त्या आधारे प्रारूप मतदार यादी २५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मात्र सहा नोव्हेंबर पर्यंतच्या अर्जांच्या आधारे प्रारूप मतदार याद्या करण्यात येणार असल्या तरी पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी १० डिसेंबर पर्यंत नावे नोंदविता येणार आहेत. या अर्जांवरील पात्र-अपात्र मतदारांबाबतचा निर्णय घेऊन ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु