
सोलापूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।श्री सिद्धेश्वर कारखान्याची चिमणीच एकमेव विमानसेवेसाठी अडथळा असल्याचे सुरवातीला वाटले. पण, विमानसेवा सुरू झाल्यानंतर एक एक समस्या समोर येऊ लागल्या आहेत. भटकी कुत्री, पक्षी, पतंग उडविणे, टायर जाळलेला धूर असे प्रमुख अडथळे अजूनही आहेत. या पार्श्वभूमीवर आता महापालिकेकडून विमानतळाच्या भिंतीपासून दोन मीटर परिसरातील अतिक्रमण हटविले जाणार आहे. तत्पूर्वी, स्वतंत्र पथकाद्वारे सर्व्हे केला जाणार आहे.सोलापूर विमानतळावरून गोवा, मुंबई, बंगळुरू, बेळगाव अशी विमानसेवा सुरू झाली आहे. पण, विमानतळ परिसरातील पतंग, पक्षी, भटक्या कुत्र्यांचा अडथळा ‘जैसे-थे’ आहे. विमानतळ परिसरातील अनधिकृत कत्तलखाने, चिकन-मटण विक्रेते, भिंतीलगत टाकलेले शिळे अन्न, यामुळे पक्ष्यांचा वावर अधिक आहे. याशिवाय परिसरातील गॅरेजवाले टायरमधील तार बाजूला काढण्यासाठी दिवसा टायर जाळतात. त्याचा धूर देखील विमानाच्या लॅण्डिंग व टेकऑपसाठी अडचणीचा ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड