
रायगड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व कोकण मराठी साहित्य परिषद, नवीन पनवेल तसेच पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता पनवेलमध्ये साहित्यिकांचा गौरव सोहळा आणि कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा पनवेल मार्केटयार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पार पडणार आहे.
या सोहळ्यास माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर अध्यक्षस्थानी राहणार असून, महाराष्ट्रातील नामवंत कवी आणि गझलकार उपस्थित राहून या कार्यक्रमाला वैभव प्राप्त करून देणार आहेत. सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर, लोकप्रिय कवी अरुण म्हात्रे आणि ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात येणार असून, कोकणातील नामवंत साहित्यिकांचाही या सोहळ्यात गौरव केला जाणार आहे. त्यानंतर होणाऱ्या कवी संमेलनात कोकण व मुंबई परिसरातील अनेक कवी आपली कवितारचना सादर करणार आहेत. सहभागी कवींना आयोजकांकडून प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल.
या सोहळ्याचे आयोजन साहित्य, काव्य आणि संस्कृती या तिन्ही घटकांचा सुंदर संगम घडवून आणणारे ठरणार असून, रसिकांसाठी हा एक आनंददायी साहित्य मेजवानीचा अनुभव देणारा कार्यक्रम ठरणार आहे. या सोहळ्याचे संयोजन कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी आणि पनवेल शाखेचे अध्यक्ष सुभाष कुडके यांनी केले असून, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके