
- गाझा, पॅलेस्टाईनमधील लोकांना मदतीच्या नावाखाली फसवणूक प्रकरणी पर्दाफाश
छत्रपती संभाजीनगर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाने गाझा आणि पॅलेस्टाईनमधील लोकांना मदत करण्याच्या नावाखाली फसवणूक प्रकरणी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात सय्यद बाबर अली सय्यद महमूद अली या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने धार्मिक आणि मानवतावादी भावनांचा गैरवापर करून नागरिकांची दिशाभूल केली असल्याचे उघड झाले आहे.
एटीएसच्या तपासात समोर आले की, सय्यद बाबर अलीने ‘अहमद राजा फाउंडेशन’ या नोंदणीकृत नसलेल्या संस्थेच्या नावाने बनावट क्यूआर कोड तयार करून नागरिकांकडून निधी गोळा केला.
याशिवाय ‘राजा एम्पॉवमेंट फाउंडेशन’ या नोंदणीकृत पण विदेशात निधी पाठवण्याचा अधिकार नसलेल्या संस्थेच्या नावानेही देणग्या जमा करण्यात आल्या. या रकमा तो स्वतःच्या बँक खात्यात जमा करून व्यक्तिगत आर्थिक फायदा मिळवत होता. त्याने ‘राजा एम्पॉवमेंट फाउंडेशन’ नावाचा यूट्यूब चॅनल सुरू करून त्याच्या माध्यमातून लोकांकडून ऑनलाइन देणग्या मागवण्याचा कट रचला होता.
तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सय्यद बाबर अलीने आपल्या खात्यातून GOFUNDME.COM या आंतरराष्ट्रीय देणगी पोर्टलवरून 14 ट्रान्झॅक्शनद्वारे तब्बल ₹10,24,220 इतकी रक्कम परदेशात पाठवली आहे. ही रक्कम नेमकी कुणाकडे आणि कोणत्या हेतूने पाठवण्यात आली, याचा तपास आता एटीएस आणि स्थानिक पोलीस संयुक्तपणे करत आहेत. एटीएसकडून पुढील काही दिवसांत आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis