बाल कामगार प्रथेविरोधी सप्ताहात सक्रिय सहभाग महत्त्वाचा - संदेश आयरे
रत्नागिरी, 13 नोव्हेंबर, (हिं. स.) : दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून बालमजुरांचे शोषण थांबविण्याच्या दृष्टिकोनातून बालकामगार प्रथेविरोधी सप्ताह साजरा करावा व यामध्ये सर्वांचा सक्रिय सहभाग लाभा
बाल कामगार प्रथेविरोधी सप्ताहात सक्रिय सहभाग महत्त्वाचा - संदेश आयरे


रत्नागिरी, 13 नोव्हेंबर, (हिं. स.) : दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून बालमजुरांचे शोषण थांबविण्याच्या दृष्टिकोनातून बालकामगार प्रथेविरोधी सप्ताह साजरा करावा व यामध्ये सर्वांचा सक्रिय सहभाग लाभावा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी केले आहे.

कामगार कार्यालयामार्फत जिल्ह्यामध्ये सप्ताहाचे आयोजन करुन विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानिमित्ताने श्री. आयरे बोलत होते. सप्ताहात प्रामुख्याने बालकामगारमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील बालकामगारांचा शोध घेऊन कारवाईसाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्यांचे अधिकारी समाविष्ट असलेले कृतीदल स्थापन केले आहे. कृतीदलाच्या सातत्याने धाडी आयोजित करण्यात येतात. तसेच सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील निरीक्षण यंत्रणेकडून सातत्याने सर्वेक्षण व निरीक्षण करण्यात येते. आढळून आलेल्या बालकामगारांचे शैक्षणिक व त्यांच्या पालकांचे आर्थिक पुनर्वसन करण्यासाठी सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) अधिनियम, १९८६ अंतर्गत सर्वच व्यवसाय व प्रक्रियांमध्ये १४ वर्षांखालील बालकांना काम करावयास प्रतिबंध आहे. त्यामध्ये हॉटेल, बांधकाम, फॅक्टरी आदी व्यवसायांचा समावेश असून घरकामासाठी बालमजूर ठेवण्यास बंदी आहे. कोणी बालमजूर ठेवल्याचे आढळल्यास वीस हजार रुपये दंड आणि १ वर्षाची कैद या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. तसेच १४ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे. फौजदारी गुन्ह्यासाठी ६ महिने तुरुंगावास, जो २ वर्षापर्यंत वाढवता येईल किंवा किमान वीस हजार रुपये ते कमाल ५० हजार रुपये इतका दंड किंवा दोन्हीही शिक्षा मालकास होऊ शकतात.

बालकामगारांस आर्थिक, कौटुंबिक व सामाजिक कारणांमुळे कोवळ्या वयातच अर्थार्जनाची कास धरावी लागते. या प्रश्नाकडे केवळ कायद्याखाली तरतुदी आणि त्याअंतर्गत असलेल्या उपाययोजनांपुरते मर्यादित दृष्टीने न पाहता बालमजुरी या प्रश्नाच्या निर्मूलनासाठी समाजाची मानसिकता आणि त्या समस्येकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल होणे आवश्यक आहे, असे श्री. आयरे यांनी सूचित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande