
मुंबई, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट आहे. हा अर्ज ऑनलाइन स्वीकारताना अडचणी उभ्या राहत आहेत त्यामुळे हे अर्ज प्रत्यक्षात स्वीकारावे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
काँग्रेसने राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांचा अर्ज हा २० पानी असून त्यात गेल्या निवडणुकीत किती मते मिळाली,किती खर्च केला अशी माहिती मागितली आहे. ही माहिती निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असतानाही मागवली आहे. यातही अर्ज भरताना प्रक्रिया किचकट आहे, शेवटच्या क्षणी विरोधकांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही अशी स्थिती निर्माण होऊ शकते.म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज प्रत्यक्षात स्वीकारण्याची विनंती केली असल्याचे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
पुण्याच्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवार जबाबदार आहे.पण निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार पक्षाचा घोटाळा बाहेर काढून त्या पक्षाची कोंडी केली आहे. येणाऱ्या निवडणुकीत पुणे,पिंपरी चिंचवड, सातारा, सांगली, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात या पक्षाने भाजप पूरक भूमिका घ्यावी या हिशोबाने अजित पवार यांचा पक्ष कमजोर करण्याचा डाव दिसत आहे. येत्या काळात महायुतीत सगळ्यात पहिला आघात अजित पवार यांच्या पक्षावर होईल आणि त्यांना सत्तेतून बाहेर पडण्याची वेळ त्यांच्यावर आणली जाईल असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत विविध ठिकाणी होणाऱ्या आघाडीचे चित्र स्पष्ट होईल, असे ही वडेट्टीवार म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर