
हजारो कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीची कारवाई
नवी दिल्ली,13 नोव्हेंबर (हिं.स.) : जेपी इन्फ्राटेक लिमीटेड नामक रिअल इस्टेट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज गौड यांना आज, गुरुवारी अटक करण्यात आली. त्यांच्यावर घर खरेदीदारांची फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गौड यांच्यावर 12 हजार कोटी रुपयांच्या हेराफेरीचा ठपका ठेवला आहे.
ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट (पीएमएलए) अंतर्गत गौड यांना ताब्यात घेतले आहे. हा कायदा काळा पैसा पांढरा करण्यास प्रतिबंध घालतो. प्राथमिक चौकशीत असे स्पष्ट झाले आहे की मनोज गौड यांनी फ्लॅट खरेदीदारांच्या निधीचा गैरवापर केला आहे. ईडी सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. यापूर्वी मे महिन्यात ईडीने जेपी इन्फ्राटेक, जयप्रकाश असोसिएट्स आणि संबंधित कंपन्यांच्या सुमारे 15 ठिकाणी छापेमारी केली होती. या कारवाईत 1.70 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. ही छापेमारी दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि मुंबई येथे करण्यात आली होती.जयप्रकाश असोसिएट्स, जेपी समूहाची मुख्य कंपनी, सिमेंट, बांधकाम, वीज, रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रांत कार्यरत आहे; मात्र सध्या तिचे बहुतांश कामकाज ठप्प झाले आहे.
घरखरेदीदारांचा निधी दुसरीकडे वापरल्याचा आरोप
जेपी इन्फ्राटेकवर आरोप आहे की कंपनीने घरखरेदीदारांकडून घेतलेला पैसा इतर प्रकल्पांमध्ये वापरला, त्यामुळे अनेक गृहप्रकल्प आजही अपूर्ण आहेत. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसेही परत मिळालेले नाहीत. यामुळे असंतुष्ट घरखरेदीदारांनी कंपनीच्या प्रमोटर्सविरुद्ध आंदोलन केले होते, त्यानंतर अनेक एफआयआर दाखल झाल्या.सध्या जयप्रकाश असोसिएट्स विक्रीच्या उंबरठ्यावर असून, संभाव्य खरेदीदारांमध्ये अदानी समूह आघाडीवर असल्याचे समजते.
ईडीची पुढील तपासणी
ईडीच्या मते, जेपी इन्फ्राटेक लिमिटेडने आपल्या रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये गुंतवणूकदारांचा निधी दुसरीकडे वळवला आणि त्याचा गैरवापर केला. या फसवणुकीमुळे अनेक गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत.मनोज गौड यांची चौकशी दरम्यान सहकार्य न केल्यामुळे आणि पुरावे हाती लागल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. आता ईडी संपत्ती जप्ती आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेऊन संपूर्ण प्रकरणाचा तपास अधिक गतीने करणार आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी