बालविवाह प्रथा थांबविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे : परभणी जिल्हाधिकारी
परभणी, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। बालविवाह हा कायदेशीर गुन्हा आहे. तसेच सामाजिक दृष्ट्या बालविवाह ही अत्यंत घातक प्रथा आहे. ती थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. जिल्हा
बालविवाह प्रथा थांबविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे : परभणी जिल्हाधिकारी


परभणी, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। बालविवाह हा कायदेशीर गुन्हा आहे. तसेच सामाजिक दृष्ट्या बालविवाह ही अत्यंत घातक प्रथा आहे. ती थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘बालविवाहमुक्त महाराष्ट्र - आपला संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बालविवाह प्रतिबंधाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आणि विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींनी ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिर्गे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी रेखा काळम, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आम्रपाली पाचपुंजे, चाईल्ड लाईन समन्वयक संदीप बेंडसुरे, पर्यवेक्षक अधिकारी श्री. तांदळे, एस.बी.सी 3/युनिसेफ चे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक बाळू राठोड, कैलास सत्यार्थी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक लक्ष्मण गायकवाड तसेच विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रिंटिंग प्रेस व इतर स्वयंसेवी संस्था संस्थेतील पदाधिकारी, लग्नासाठी सेवा पुरविणारे सेवापुरवठादार, कापड दुकानदार, किराणा दुकानदार, सोनार, बँडवाले, मंगलकार्यालयाचे मालक, प्रिंटींग प्रेस संघटना, विवाह लावणारे हिंदू धर्मातील ब्राह्मण/ पुरोहित, मुस्लिम धर्मातील काजी/मौलवी त्याचबरोबर बौद्ध धर्मातील भदंतेजी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण शून्य करणे हा आपला संकल्प असावा. यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. शाळेत सतत गैरहजर असणाऱ्या मुलींची माहिती घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. बालविवाह रोखणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. ग्रामसभांमध्ये बालविवाह होणार नाही, असा ठराव संमत करून घेण्यात यावा. बालविवाह प्रतिबंध ही एक लोकचळवळ व्हावी. शाळांमध्ये जशी प्रार्थना केली जाते, त्याचप्रमाणे दररोज ‘बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा’ घेण्यात यावी. तसेच १०९८ या चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकाची जनजागृती व्हावी.

या अभियानात पोलिस यंत्रणा, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहनही करण्यात आले. धर्मगुरूंनींही या मोहिमेत सक्रिय सहभागाची ग्वाही दिली.

युनिसेफचे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक बाळू राठोड यांनी सांगितले की, मागील तीन महिन्यांत 100 गावांमध्ये पालकांबरोबर बालविवाह प्रतिबंध जनजागृती मोहीम राबवली असून, 100 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळांच्या माध्यमातून बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगितले आहेत.

बैठकीचे सूत्रसंचालन चाईल्ड लाईन समन्वयक संदीप बेंडसुरे यांनी केले, तर आभार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande