
रायगड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल आणि श्री गुरुकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद भगवद गीता पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवार, दिनांक १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या स्पर्धेचे पनवेलमध्ये प्रथमच आयोजन होत असल्याने या उपक्रमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ही प्राथमिक फेरी पार पडणार आहे. स्पर्धा दोन गटांमध्ये — शालेय गट आणि खुला गट — विभागून घेण्यात आली आहे. शालेय गटातील फेरी पनवेल, नवीन पनवेल आणि कामोठे येथे तर खुला गटातील स्पर्धा खांदा कॉलनी येथे पार पडणार आहे.
ही स्पर्धा दोन टप्प्यांत म्हणजे प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा पद्धतीने घेण्यात येणार असून, स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. गीता पठण स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि संस्कृत भाषेचे महत्त्व रुजविण्याचा उद्देश आयोजकांचा आहे. या उपक्रमाद्वारे युवकांना गीतेतील तत्त्वज्ञान समजून घेण्याची आणि ते जीवनात आचरणात आणण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांना या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके