
जळगाव , 13 नोव्हेंबर (हिं.स.) : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भाववाढीत चांदीत वाढ कायम राहत ती 2 हजार रुपयांनी वधारून 1 लाख ५८ हजार ५०० रुपयांवर पोहोचली आहे. तर सोन्याच्या भावात ५०० रुपयांची घसरण होऊन ते 1 लाख २३ हजार ८०० रुपयांवर आले आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून घसरण सुरू झालेल्या सोने-चांदीच्या भावात १० नोव्हेंबरपासून पुन्हा भाववाढ सुरू झाली. त्यामुळे दोन दिवसांत सोन्याच्या भावात चार हजार रुपयांची वाढ होऊन ११ नोव्हेंबर रोजी ते एक लाख २४ हजार ३०० रुपयांवर पोहोचले होते. मात्र १२ नोव्हेंबर रोजी त्यात ५०० रुपयांची घसरण होऊन ते एक लाख २३ हजार ८०० रुपये प्रति तोळा झाले. दुसरीकडे मात्र चांदीच्या भावात वाढ सुरूच आहे. १० व ११ नोव्हेंबर या दोन दिवसांत चांदीमध्ये सात हजार ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ११ रोजी चांदी एक लाख ५६ हजार ५०० रुपयांवर पोहोचली. पुन्हा दोन हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ५८ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. तीन दिवसांत चांदीमध्ये तब्बल नऊ हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर