
जळगाव, 13 नोव्हेंबर (हिं.स.)न्हावी, ता. यावल परिसरात सध्या एक हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळत आहे. शेतकरी आपल्या हातांनी घडवलेल्या केळीच्या बागा फेकुन ठेवताना दिसत आहे. बाजारात मिळणारा कवडीमोल भाव आणि व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक यामुळे केळी उत्पादकांचा आर्थिक कणा पूर्णपणे मोडून पडला आहे. लागवडीपासून ते काढणीपर्यंत लाखो रुपये खर्च करूनही शेतकऱ्यांच्या हातात आता काहीच पडत नाही. दिवसेंदिवस वाढत चाललेले उत्पादन खर्च, मजुरी, वीज, खतखर्च आणि वाहतूकदर यांच्या पार्श्वभूमीवर केळीच्या दरातील मोठी घसरण शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. यंदा एप्रिल मे महिन्यात महिन्यात केळीला बाजारात २ हजार २०० ते २ हजार ५०० रु. प्रति क्विंटल दर मिळत होता. मात्र, सध्या तो भाव थेट 300 ते 400 रु. पर्यंत कोसळला आहे.
काही ठिकाणी तर एक घड केवळ १० रुपयांना विकला जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी केळी बागा फेकुन देताता दिसत आहे. शेतकऱ्यांचे “कष्टाचं सोनं मातीमोल होतंय” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावल रावेर तालुक्यात हजारो एकरांवर केळीची शेती आहे. पण बाजारात मागणी नसल्याने शेतातच केळीची नासाडी होत आहे. शेतकरी आपल्या पिकाकडे हताश नजरेने पाहत आहेत. पिकलेल्या केळीला बाजारपेठ नसल्याने, शेतकऱ्यांना बांगेतच केळी सडू द्यावी लागत आहे. शहरांमध्ये डझनला ३०-४० रु दराने केळी विकली जात असताना, त्याच केळीचे घड शेतकऱ्यांकडून व्यापारी 10ते 20केळी गड मागत आहे. अतिशय कमी दरात खरेदी करतात. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आणि असंतोष वाढत आहे. आम्ही तयार केलेलं उत्पादन शहरात महाग विकलं जातं, पण आमच्याकडे येतो तुटपुंजा भाव!’ अशी खंत शेतकऱ्याची व्यक्त होत आहे. भारतातून होणाऱ्या केळी निर्यातीपैकी सुमारे ७० टक्के निर्यात खाडी देशांकडे जाते. मात्र, अलीकडेच या देशांनी पाकिस्तानी केळीची आयात सुरू केल्याने भारतीय केळीच्या मागणीत मोठी घट झाली आहे. त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारावर झाला असून, दर कोसळले आणि शेतकऱ्यांचा आर्थिक तोल बिघडला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर