स्थानिक रोजगारासाठी कर्जत ठेकेदार संघटना सज्ज
रायगड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। स्थानिक ठेकेदारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कर्जत तालुका ठेकेदार संघटना आता आक्रमक भूमिकेत आली आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत बाहेरील ठेकेदारांना तालुक्यात कोणत्याही परिस्थितीत काम करू न देण्याचा ठाम निर्धार व्यक्त
“स्थानिक रोजगारासाठी कर्जत ठेकेदार संघटना सज्ज — बाहेरील ठेकेदारांविरोधात हल्लाबोल”


रायगड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। स्थानिक ठेकेदारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कर्जत तालुका ठेकेदार संघटना आता आक्रमक भूमिकेत आली आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत बाहेरील ठेकेदारांना तालुक्यात कोणत्याही परिस्थितीत काम करू न देण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. या बैठकीचे अध्यक्षस्थान संघटनेचे अध्यक्ष राहुल डाळिंबकर यांनी भूषवले.

गेल्या काही वर्षांत कर्जत तालुक्यात बाहेरील ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केली असून, राजकीय पाठबळाच्या जोरावर ते कोट्यवधी रुपयांची कामे मिळवतात, तर स्थानिक ठेकेदारांना किरकोळ कामांसाठीही विनंती करावी लागते, अशी खंत या बैठकीत अनेकांनी व्यक्त केली. बाहेरील ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यांवरील कामे वर्षभर टिकत नाहीत, खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होतात, तरी प्रशासन त्यांच्या विरोधात कारवाई करत नाही, असा आरोप संघटनेने केला.

स्थानिक ठेकेदार आपल्या परिसरातील कामांबाबत जबाबदारीची भूमिका घेतात, दर्जेदार कामाला प्राधान्य देतात, पण आर्थिक देवाणघेवाणीतून कामे मिळवणारे बाहेरील ठेकेदार दर्जा पूर्णपणे घालवतात, असा आरोप करण्यात आला.

संघटनेचे सचिव उदयभाई पाटील म्हणाले, “आम्ही एकत्र आलो नाही, तर जसे परप्रांतीयांनी शहरांतील रोजगार व्यापले तसेच बाहेरील ठेकेदार आपल्याला व्यवसायातून बाहेर फेकतील.” बैठकीत एकमुखाने ठरविण्यात आले की, तालुक्यातील भूमिपुत्रांचा रोजगार हिरावणाऱ्या परप्रांतीय ठेकेदारांना काम करू देणार नाही. स्थानिक ठेकेदारांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र राहण्याचे आवाहनही करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande