
परभणी, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।पूर्णा नगरपालिकेंतर्गत नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीकरीता महाविकास आघाडीद्वारे सौ. प्रेमलता संतोष एकलारे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी दिली.
नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी अंतर्गत नेतेमंडळींची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. खासदार जाधव हे यास आवर्जून उपस्थित होते. या बैठकीतून अध्यक्षपदाकरीता सौ. एकलारे यांच्या उमेदवारीचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. खासदार जाधव यांनी पत्रकार परिषदेतून तो निर्णय जाहीर केला. संतोष एकलारे हे पूर्णेकरांच्या दृष्टीने सर्वमान्य असे नेतृत्व आहे, एकलारे यांनी आजतागायत सर्वांना सोबत घेऊन पूर्णेत उत्कृष्ट कामे केली आहे. सर्वमान्य असे नेतृत्व म्हणजे एकलारे होय. त्यामुळेच पूर्णा पालिकेंतर्गत नगराध्यक्षपदाकरीता सौ. एकलारे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पूर्णेकर या उमेदवारामागे भक्कमपणे समर्थन उभे करतील, प्रचंड बहुमताने महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून देतील, असा विश्वास जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis