
जळगाव, 13 नोव्हेंबर, (हिं.स.) - आगामी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं महत्त्वाच्या ‘निवडणूक प्रभारी पदांच्या नियुक्त्या’ जाहीर केल्या आहेत. यात मंत्री गुलाबराव पाटील यांचाही समावेश असून त्यांच्याकडे जळगाव जिल्ह्यातील चार नगरपरिषद अन् नगरपंचायतची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये राज्यातील जवळपास ७० हुन अधिक जणांची ‘निवडणूक प्रभारी पदांसाठी नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, एरंडोल पारोळ्याचे आमदार अमोल पाटील, चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे तर काही दिवसापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केलेल्या अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याही निवडणूक प्रभारी पदांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जिल्ह्यातील धरणगाव,वरणगाव, भुसावळ आणि नशिराबाद या नगरपरिषद/नगरपंचायत प्रमुख’ म्हणून अधिकृतरित्या नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्री पाटील यांचा अनुभवाचा आणि नेतृत्वाचा फायदा घेत, या चार भागांतील पक्षाची ताकद वाढवणे आणि निवडणुकीत प्रभावी कामगिरी करणे, हा या नियुक्तीमागील मुख्य उद्देश आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांची निवडणूक प्रभारी पदांसाठी नियुक्ती झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या नियुक्तीबद्दल अनेक शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर