
पुणे, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।
सध्या लग्नसराईचा काळ चालू असून लग्नात प्रि-वेडींग फोटोशूटचे प्रमाण वाढले आहे. प्रिवेडींग हटके असावे अशी इच्छा सर्वांची असते. असा हट के फोटोशूट एका जोडप्याला महागात पडले आहे. त्यांनी महामेट्रोकडून परवानगी न घेता मेट्रोमध्ये फोटोशूट केल्याने त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे. मेट्रोने याची गंभीर दखल घेतली असून योग्य ती कारवाई केली जाईल, असे महामेट्रोचे चंद्रशेखर तांबवेकर यांनी सांगितले आहे.
मेट्रो सुरू झाल्यापासून अनेकांनी सेल्फी, फोटो काढून मेट्रो प्रवासाचे क्षण मोबाइलमध्ये साठवले आहेत. मात्र मेट्रोत फोटोग्राफी किंवा विडिओग्राफी करताना महामेट्रोची परवानगी घेणे अपेक्षित आहे. हा प्रवासी आणि मेट्रो सुरक्षेतील महत्वाचा भाग आहे. मेट्रोसारख्या गर्दी असलेल्या ठिकाणांवर फोटोशूटींगमुळे केल्याने प्रवाशांच्या गैरसोईत वाढ होते. शिवाय अशा चित्रीकरणाचा वापर असामाजिक तत्वांकडून होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेसाठी हा नियम महत्त्वाचा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु