
श्रीनगर , 13 नोव्हेंबर (हिं.स.) - दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा दुवा जम्मू–काश्मीरशीही जोडला गेला आहे या पार्श्वभूमीवर जम्मू–काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले कि, जम्मू–काश्मीरमधील प्रत्येक व्यक्ती दहशतवादी नाही.
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले, “या घटनेवर मी पहिल्याच दिवशी माझी प्रतिक्रिया दिली होती. या हल्ल्याची कितीही निंदा केली तरी ती अपुरीच आहे. निर्दोष लोकांचा इतक्या निर्दयपणे खून करणे, याला कोणताही धर्म किंवा कोणताही मुद्दा समर्थन देऊ शकत नाही. कारवाई सुरू आहे आणि तपास पुढे चालूच राहील.”
दहशतवाद आणि जम्मू–काश्मीर यांच्यातील दुव्याबाबत बोलताना उमर अब्दुल्ला म्हणाले, “आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की जम्मू–काश्मीरमधील प्रत्येक व्यक्ती दहशतवादी नाही. प्रत्येक काश्मीरी दहशतवाद्यांशी जोडलेला नाही. हे काही मोजके लोक आहेत, ज्यांनी नेहमी येथे शांती आणि बंधुभाव बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे.”
ते पुढे म्हणाले, “दुर्दैवाने, आपण जेव्हा प्रत्येक जम्मू–काश्मिरी नागरिकाकडे आणि प्रत्येक काश्मीरी मुसलमानाकडे एकाच नजरेने पाहू लागतो आणि अशी प्रतिमा तयार करू लागतो की प्रत्येक काश्मीरी मुसलमान म्हणजे दहशतवादी, तेव्हा लोकांना योग्य मार्गावर ठेवणे अत्यंत कठीण बनते.” मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटले, “या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, पण निर्दोष लोकांना या सर्वांपासून दूर ठेवले पाहिजे.”
पुढे ते असेही म्हणाले, “आपण याआधीही अशी उदाहरणे पाहिली आहेत. काश्मीर विद्यापीठातील एक सहयोगी प्राध्यापक (असोसिएट प्रोफेसर) अशा गोष्टींमध्ये सामील होता. कोठे लिहिले आहे की शिक्षित लोक अशा कृतींमध्ये सहभागी होत नाहीत? मला आश्चर्य वाटते की त्याला नोकरीतून काढून टाकण्यात आले, पण त्यानंतर नेमकी कोणती चौकशी झाली? कोणती कायदेशीर कारवाई झाली? जर तुम्हाला वाटतं की तो दहशतवादी क्रियाकलापांमध्ये सामील होता, तर तुम्ही पुरावे घेऊन न्यायालयात का गेला नाहीत? नोकरीतून काढून टाकणे म्हणजे प्रकरण संपले असे होत नाही, ही वस्तुस्थिती आता सर्वांसमोर आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode